थोडक्‍यात बातम्या रायगड

थोडक्‍यात बातम्या रायगड

Published on

ललित कदम माणगाव रत्न पुरस्काराने सन्मानित
माणगाव (वार्ताहर) ः स्व. लोकनेते अशोकदादा साबळे यांच्या नवव्या स्मृतिदिनानिमित्त माणगाव येथे विविध हृदयस्पर्शी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या वेळी माणगावमधील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. कुमार ललित कदम याने मागील चार वर्षांत क्रीडा क्षेत्रात (जलतरण) नैपुण्य अशी कामगिरी करत जिल्हा, विभाग आणि राज्य स्तरावर गोल्ड, सिल्वर आणि ब्राँझ पदके मिळवून माणगाव तालुक्याच नाव प्रकाशझोतात आणले आहे. त्यामुळे त्याच्या या कौशल्याची दखल घेऊन गुरुवार २९ रोजी गांधी हॉल माणगाव येथे झालेल्या कार्यक्रमात ललित कदम याला माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्या हस्ते आणि विविध मान्यवरांच्या उपस्थितीत क्रीडा क्षेत्रातील माणगाव रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
.............
बाबुराव कांबळे यांना राज्यस्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार
माणगाव (वार्ताहर) ः माणगाव तालुक्यातील लोणेरे जवळ असलेल्या जे. बी. सावंत हायस्कूल, पन्हळघर-लोणेरे या शाळेचे मुख्याध्यापक बाबुराव कांबळे यांना आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळ, मुंबई यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार समारंभ कराड येथे मोठ्या उत्साहात पार पडला. गेल्या ३३ वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या कांबळे यांनी २९ वर्षे मुख्याध्यापक म्हणून यशस्वी कामकाज केले आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी विविध शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांद्वारे शाळेला विशेष ओळख मिळवून दिले आहे. या यशाबद्दल बोलताना कांबळे म्हणाले की, हा सन्मान माझा एकट्याचा नसून, माझ्या संपूर्ण संस्थेचा आहे. मला सदैव प्रेरणा आणि पाठबळ देणाऱ्या पन्हळघर शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यवाह नाना सावंत, अध्यक्ष कै. बंधु घोसाळकर, भाऊसाहेब सावंत व सर्व संस्था सदस्य, तसेच जे. बी. सावंत हायस्कूलमधील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे मी मनःपूर्वक आभार मानतो. तसेच त्यांनी माणगाव-तळा तालुका मुख्याध्यापक संघ, रायगड जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सर्व पदाधिकारी आणि मार्गदर्शक अविनाश म्हात्रे पाटील यांचेही विशेष आभार व्यक्त केले.
...............
राधाबाई शेळके यांचे निधन
पोयनाड (बातमीदार) : अलिबाग तालुक्यातील धामणपाडा गावातील रहिवासी ज्येष्ठ नागरिक राधाबाई मुरलीधर शेळके यांचे बुधवार २९ मे रोजी आकस्मिक निधन झाले. निधनसमयी त्यांचे वय ७७ वर्ष होते. त्यांच्यावर धामणपाडा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. धामणपाडा गावातील प्रत्येक सामाजिक तसेच धार्मिक कार्यात त्यांचा मोठा सहभाग असत. त्यांच्या पश्चात मुले, मुली, सुना, जावई नातवंडे व समस्त शेळके परिवार आहे. राधाबाई शेळके यांचे उत्तरकार्य सोमवार १० नोव्हेंबर रोजी धामणपाडा येथे राहत्या घरी होणार आहे. त्यांना ग्रामस्थ मंडळ धामणपाडा यांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
..................
तळाशेत येथे नवीन पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन
पोयनाड (बातमीदार) : अलिबाग तालुक्यातील ग्रामपंचायत ताडवागळे हद्दीतील तळाशेत गावामध्ये नवीन पाणीपुरवठा योजनेचे नुकतेच भूमिपूजन करण्यात आले. या पाणीपुरवठा योजनेअंतर्गत तळाशेत गावासाठी नवीन एमआयडीसी पाण्याची पाइपलाइन टाकण्याचा कार्यक्रम पार पडला. शिवसेना जिल्हाप्रमुख राजा केणी यांच्या हस्ते हे भूमिपूजन करण्यात आले. शिवसेना उपतालुकाप्रमुख युवासेना संकेत पाटील, शिवसेना विभागप्रमुख स्वप्नील म्हात्रे, उत्तम पाटील, हृदयनाथ पाटील, मकरंद म्हात्रे, सुभाष म्हात्रे, कैलास म्हात्रे, उमेश पाटील, राजेश जुईकर, प्रशांत जुईकर, विजय जाधव, कृष्णा लोभी आणि ग्रामस्थ आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. तळाशेत गावामध्ये नवीन एमआयडीसी पाण्याची पाइपलाइन येत असल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
.....................
पूरग्रस्तांसाठी माजी नगरसेविका स्वामीनी मांजरे यांचा मदतीचा हात
कर्जत (बातमीदार) ः राज्यात अवकाळी पावसाने थैमान घातल्याने अनेक कुटुंबांवर संकटाचे सावट आले आहे. शेती तसेच घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊन जनजीवन विस्कळित झाले आहे. या संकटाच्या काळात कर्जत नगर परिषदेच्या माजी नगरसेविका स्वामीनी देवेंद्र मांजरे यांनी पुढाकार घेत मुख्यमंत्री सहाय्यता निधीस एक लाख अकरा हजार अकरा रुपये मदत दिली आहे. ता. २८ ऑक्टोबर रोजी आपल्या वाढदिवसानिमित्त त्यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन ही मदत रक्कम सुपूर्द केली. संकटात सापडलेल्या पूरग्रस्तांना थोडासा आधार मिळावा यासाठी हा छोटासा हातभार असल्याचे त्या म्हणाल्या. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, अनेकांना नव्याने उभे राहण्यासाठी शासनाच्या मदतीची गरज आहे. या पार्श्वभूमीवर सर्व सक्षम नागरिकांनीही आपापल्या परीने मदतीचा हात पुढे करावा, अशी विनंती स्वामीनी मांजरे यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com