कचरा संकलन वादाच्या भोवऱ्यात
कचरा संकलन वादाच्या भोवऱ्यात
कल्याण-डोंबिवलीकरांना पालिकेचे ‘वार’
कल्याण, ता. ३० (वार्ताहर) : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने घरगुती कचरा संकलनासाठी कचऱ्याच्या प्रकारानुसार आठवड्याचे ठरावीक वार निश्चित केले आहेत. घनकचरा उपायुक्त रामदास कोकरे यांच्या आदेशानुसार जारी झालेल्या या ‘फतव्या’मुळे सर्वसामान्यांना पुन्हा वेठीस धरले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केले आहेत.
पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने हे स्पष्ट केले आहे की, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी दररोज घराघरातून कचरा संकलन करत असले तरी वेळापत्रकानुसार आठवड्याच्या ठरावीक दिवशी कल्याण-डोंबिवलीकरांनी विशिष्ट कचरा प्रकार वेगळा करूनच द्यायचा आहे. पूर्वी संकलन न झालेल्या किंवा मिश्र कचऱ्यामुळे अडचणी निर्माण होत असल्याचे कारण पालिकेने दिले आहे. याशिवाय कल्याण डोंबिवलीकर घरगुती ओला आणि सुका कचरा ठरलेल्या दिवशी आधीपासूनच वेगळा करून देत आहेत. पालिकेच्या वेळापत्रकानुसार नागरिकांना विशिष्ट दिवशीच विशिष्ट प्रकारचा कचरा वेगळा करून देणे बंधनकारक करण्यात आले आहे.
नागरिकांचा रोष
हे नवे नियम ठेकेदाराच्या सोयीसाठी काढले असून, सामान्य नागरिकांना वेठीस धरले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. माजी नगरसेवक मोहन उगले यांनी आयुक्तांना पत्र देऊन, ‘वारानुसार कचऱ्याचे डबे घरात साठवून ठेवायचे का?’ असा सवाल केला आहे. कल्याण-डोंबिवलीकर ओला आणि सुका कचरा आधीच वेगळा देत असताना, पुन्हा ही बारीक वर्गवारी लादल्याने संताप व्यक्त होत आहे.
कारवाईचा इशारा :
पालिकेने स्पष्ट केले आहे की, वेळापत्रकानुसार कचरा न दिल्यास संकलन केले जाणार नाही. नागरिकांनी सहकार्य न केल्यास कारवाई करण्याचा इशाराही पालिकेने दिला आहे.
बचत गट दुर्लक्षित :
महापालिकेने सात प्रभागांमध्ये कचरा संकलनासाठी खासगी ठेकेदाराला पुढील १० वर्षांसाठी प्रतिवर्षी ८८ कोटी रुपयांचा मोबदला देण्याचे निश्चित केले आहे. या खासगीकरणात स्थानिक महिला बचत गटांना रोजगाराच्या प्रवाहात आणण्याचा उद्देश मात्र दुर्लक्षित राहिल्याचे म्हटले जात आहे.
आठवड्याचा वार संकलित करावयाचा विशिष्ट कचरा
सोमवार प्लॅस्टिक व प्लॅस्टिकच्या बाटल्या
मंगळवार कपडे, फर्निचर व गाद्या
बुधवार कागद, वह्या, पुस्तके
गुरुवार प्लॅस्टिक आणि प्लॅस्टिकचे भंगार
शुक्रवार ई-कचरा, धातूचा कचरा, स्वयंपाकघरातील टाकाऊ वस्तू
रविवार कागद व जुनी पुस्तके

