नवीन पनवेलमध्ये दूषित पाणीपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त
नवीन पनवेलमध्ये दूषित पाणीपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त
आरोग्य धोक्यात; सिडको प्रशासनाविरोधात आंदोलनाचा इशारा
पनवेल, ता. ३० (बातमीदार) ः नवीन पनवेल सेक्टर १७ पीएल-५ परिसरातील नागरिक गेल्या काही दिवसांपासून दूषित आणि मातीमिश्रित पाण्याच्या पुरवठ्यामुळे त्रस्त आहेत. परिसरातील १ ते २४ क्रमांकाच्या इमारतींमध्ये नळातून गढूळ, दुर्गंधीयुक्त पाणी येत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अनेक ठिकाणी पोटाचे विकार, डायरिया आणि काॅलरा यांसारख्या आजारांचे रुग्ण वाढत असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
आधीच कमी दाबाने पाणीपुरवठा होत असताना आता नळातून येणारे पाणी पिण्यास अयोग्य झाल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. स्वयंपाक आणि स्नानासाठीही हे पाणी वापरणे अवघड झाले आहे. या समस्येबाबत सिडको प्रशासनाला वारंवार कळवूनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने रहिवाशांमध्ये तीव्र नाराजी आहे. दूषित पाणीपुरवठा तत्काळ थांबवून स्वच्छ पाण्याची व्यवस्था केली नाही, तर सिडको प्रशासनाविरुद्ध मोर्चा काढून जाब विचारला जाईल, असा थेट इशारा स्थानिक रहिवाशांनी दिला आहे, तर काही समाजसेवी संघटनांनीही या आंदोलनाला पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली आहे. नवीन पनवेल परिसरात गेल्या काही वर्षांत नागरीकरण झपाट्याने वाढले असून, पाणीपुरवठ्याच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जुनी पाइपलाइन, अकार्यक्षम फिल्टरिंग व्यवस्था आणि दुरुस्तीतील ढिलाई यामुळे रहिवाशांना दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याचे नागरिकांचे मत आहे.

