उरण बायपास मार्ग निधीअभावी रखडला
उरण बायपास मार्ग निधीअभावी रखडला
४०० मीटर भूसंपादनासाठी १२ कोटींच्या निधीची प्रतीक्षा; नागरिकांमध्ये संताप
उरण, ता. ३० (वार्ताहर) : उरण शहराला वाहतूक कोंडीच्या समस्येतून मुक्त करणारा अत्यंत महत्त्वाकांक्षी उरण बायपास प्रकल्प केवळ १२ कोटी रुपयांच्या निधीअभावी रखडला आहे. या निधीअभावी ४०० मीटर भूसंपादनाचे काम थांबले असून, नागरिकांकडून प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
उरण शहरातील कोट नाका, राजपाल नाका, चारफाटा, गणपती चौक, वैष्णवी हॉटेल या परिसरात सततची होणारी वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टिकोनातून सामाजिक कार्यकर्ते गोपाल पाटील यांच्या मागणीनुसार उरण नगरपालिकेने २००१मध्ये या बायपास मार्गाची योजना आखली होती. कोट नाका येथील पेट्रोलपंप ते बोरी-पाखाडीदरम्यानच्या बाह्यवळण रस्त्याचा आरखडा तयार करण्यात आला. या मार्गाची १,१५० मीटर लांबी आणि १२ मीटर रुंदी असून, त्याचे भूमिपूजन २००१ रोजी तत्कालीन मंत्री नितीन गडकरी आणि राज ठाकरे यांच्या हस्ते झाले होते. त्यानंतर २००८मध्ये तत्कालीन नगरविकास मंत्री सुनील तटकरे यांनी सिडको, नगरपालिका आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या बैठकीत तत्काळ निधी मंजूर करण्याचे आदेश दिले होते. परिणामी २७ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला. यानंतर माजी आमदार मनोहर भोईर आणि आमदार महेश बालदी यांच्या पाठपुराव्यामुळे सिडकोमार्फत एक किलोमीटरच्या कामासाठी ४२ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला. हे काम जे. एम. म्हात्रे इन्फ्रा कंपनीला देण्यात आले आहे. नगरपालिका हद्दीतील ४०० मीटर रस्ता पूर्ण करण्यासाठी सुमारे ४,२०० चौरस मीटर खासगी जमीन संपादन करणे आवश्यक आहे. या भूसंपादनासाठी १५ भोगवटादारांना सुमारे १२ कोटी रुपयांचा मोबदला द्यावा लागणार आहे. हा निधी उपलब्ध नसल्याने नगरपालिका प्रशासनाने सिडकोकडे प्रस्ताव पाठविला असून, सिडकोमार्फत निधी मंजुरीसाठी पाठपुरावा सुरू आहे. आमदार महेश बालदी यांनीही या निधीसाठी सिडको आणि राज्य शासन स्तरावर पाठपुरावा सुरू केल्याची माहिती मिळाली आहे. २००१मध्ये सुरू झालेला हा बायपास प्रकल्प अखेर २४ वर्षांनंतरही अपूर्ण असून, नागरिकांच्या संयमाचा अंत होत आहे. निधीअभावी रखडलेल्या या कामामुळे शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न अजून किती वेळ राहणार आहे, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
---//
चौकट
हा मार्ग पूर्ण झाल्यावर उरण शहरातील जवळपास ७५ टक्के वाहतूक कोंडी मार्गी लागणार आहे. उरण शहरात असणाऱ्या शासकीय कार्यालयात येणाऱ्या नागरिकांचा वेळ आणि पैसा वाचणार आहे. वाहतूक कोडीत अडकलेल्या नागरिकांना या मार्गामुळे दिलासा मिळणार आहे. तसेच यामुळे ॲम्ब्युलन्स अथवा पोलिस व्हॅनलाही अडकून बसावे लागणार नाही. विद्यार्थ्यांनाही या वाहतूक कोंडीतून या मार्गामुळे दिलासा मिळणार आहे.
---///
चौकट
उरण नगरपालिकेचे शहर अभियंता निखिल धोरे यांनी सांगितले, की रस्त्याच्या कामासाठी निधी मंजूर आहे. मात्र ४०० मीटर भूसंपादनासाठी १२ कोटी रुपयांची गरज आहे. त्यासाठी सिडकोकडे मागणी केली असून, पाठपुरावा सुरू आहे. हे काम लवकरच मार्गी लागेल.
---//
चौकट
सिडको हद्दीतील काम जलद गतीने सुरू असून, डिसेंबरअखेरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता असल्याचे सिडकोचे कार्यकारी अभियंता राजेंद्र रेडे यांनी सांगितले. त्यांनी म्हटले, की सिडको हद्दीतील कामासाठी ४२ कोटींचा निधी मंजूर असून, हे काम प्रगतिपथावर आहे. उर्वरित भाग हा नगरपालिकेच्या हद्दीतील असल्याने त्यासाठी निधीची आवश्यकता आहे.

