चारित्र्याच्या संशयातून डॉक्टर पत्नीवर हल्ला
मित्राच्या फोटोवरील प्रतिक्रियेमुळे डॉ. शिंदेंवर पतीचा हल्ला
अंबरनाथप्रकरणी आरोपीला अटक
अंबरनाथ, ता. ३० (वार्ताहर) ः प्रसिद्ध रेडिओलॉजिस्ट डॉ. किरण शिंदे यांच्यावर त्यांच्या पतीनेच घरगुती कलह व चारित्र्याच्या संशयातून खलबत्त्याच्या मुसळीने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना बुधवारी (ता. २९) पहाटे अंबरनाथमध्ये घडली. काही दिवसांपूर्वी डॉ. किरण कौटुंबिक सहलीसाठी गेल्या होत्या. त्यांनी सहलीदरम्यान समाजमाध्यमावर ठेवलेल्या फोटोला त्यांच्या मित्राने ‘नाईस डीपी’ अशी प्रतिक्रिया केल्यावरून सुरू झालेल्या वादातून पती विश्वंभर शिंदे याने हा जीवघेणा हल्ला केला. अंबरनाथ पोलिसांनी याप्रकरणी विश्वंभरला बुधवारी (ता. २९) रात्री उशिरा अटक केली असून, अंबरनाथ न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
अंबरनाथ (पश्चिम) येथील मोहन सबरबिया गृहसंकुलात शिंदे दाम्पत्य कुटुंबासह राहते. बुधवारी सकाळी डॉ. किरण यांनी नेहमीप्रमाणे गाण्याचा रियाज केल्यानंतर पतीला चहासाठी विचारणा केली. त्या वेळी काही दिवसांपूर्वी माथेरान येथे परिवारासह गेलेल्या सहलीदरम्यान त्यांच्या समाजमाध्यमावरील डीपीवर ठेवलेल्या फोटोवर एका मित्राने केलेल्या ‘नाईस डीपी’ या कमेंटवरून दोघांमध्ये वाद झाला. याचाच राग मनात धरून विश्वंभर शिंदे यांनी पत्नीचा गळा आवळून, जमिनीवर पाडून, खलबत्त्याच्या मुसळीने डोक्यावर वारंवार वार केला. या हल्ल्यात डॉ. किरण गंभीर जखमी झाल्या असून, त्यांच्या आरडाओरडीनंतर घरातील मुलांनी धाव घेत हस्तक्षेप केला आणि आईचा जीव वाचवला. या वेळी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या किरण यांना त्यांच्या मुलांनी तत्काळ बदलापूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून, सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
पोलिस निरीक्षक उमेश सावंत व पोलिस उपनिरीक्षक रूपाली साळवे यांनी या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळाची पाहणी केली. डॉ. किरण यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, अंबरनाथ न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक शब्बीर सय्यद यांनी दिली.
...
काही वर्षांपासून वाद
डॉ. किरण शिंदे या बदलापूर व परिसरात परिचित रेडिओलॉजिस्ट असून, त्यांचे ‘किरण रेडिओलॉजिस्ट सेंटर’ बदलापूरमध्ये आहे. तसेच उल्हासनगर व ग्रामीण भागातही काही शाखा असून, पती विश्वंभर हे या केंद्राचे व्यवस्थापन पाहतात. गेल्या काही वर्षांपासून या दाम्पत्यामध्ये वाद सुरू असून, २०२३ मध्ये डॉ. शिंदे यांनी पतीच्या अत्याचारांविरोधात दोन वेळा एनसी नोंदवली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

