घरकुले पूर्ण करायची कशी?
घरकुले पूर्ण करायची कशी?
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेपुढे पेच
राहुल क्षीरसागर
ठाणे, ता. ३० ः जिल्ह्यातील शहापूर, मुरबाड, भिवंडी, कल्याण, अंबरनाथ पाच तालुक्यांमध्ये २०१६-१७ ते २०२१-२२ या कालावधीतील तब्बल १७५ घरकुले मागील चार वर्षांपासून अपूर्ण अवस्थेत आहेत. लाभार्थी प्रतिसाद देत नसणे (४८ घरे), कायमस्वरूपी स्थलांतर, लाभार्थी मयत होणे, तसेच डोंगराळ भागात बांधकाम साहित्य नेण्यास येणाऱ्या अडचणी यामुळे ही घरकुले पूर्ण करायची कशी, असा मोठा पेच जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेपुढे उभा ठाकला आहे.
असे असले तरी, दुसरीकडे जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाअंतर्गत टप्पा एकमधील अपूर्ण घरकुले पूर्ण करण्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
ग्रामीण भागात कच्च्या घरांमध्ये राहणाऱ्या गोरगरीब कुटुंबीयांचे पक्क्या घराचे स्वप्न सत्यात उतरावे, यासाठी केंद्र व राज्यपुरस्कृत घरकुल योजना राबविण्यात येत आहे. त्यानुसार ठाणे जिल्ह्यात जिल्हा ग्रामीण विकास यंत्राणांच्या माध्यमातून या योजना राबविण्यात येत आहे. अशातच राज्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबविण्यात येत आहे. यामध्ये घरकुलांना उद्दिष्टाप्रमाणे मंजुरी देणे, मंजूर घरकुलांना कामाचे टप्प्यानुसार हप्ता वितरित करणे, वाळू, रेती पासचे वितरण तसेच सर्व घरकुले भौतिकदृष्ट्या पूर्ण करणे व टप्पा दोनमधील मंजूर घरकुलांना प्रधानमंत्री सूर्यघर योजना लाभाची अंमलबजावणी हे उपक्रम समाविष्ट आहेत.
पाहणी दौरा
जिल्ह्यातील केंद्र व राज्यपुरस्कृत योजनेंतर्गत मुरबाड तालुक्यातील पाटगाव, शिरगाव शहापूर तालुक्यातील खातिवली, बोरशेती, खर्डी व भिवंडी तालुक्यातील काटई, कांबे, पारिवली येथील मंजूर ग्रामीण घरकुलांच्या कामांचा नुकताच पाहणी दौरा ग्रामीण गृहनिर्माण, महाराष्ट्र राज्य संचालक डॉ. राजाराम दिघे, अपर आयुक्त (विकास), कोकण विभाग माणिक दिवे यांच्यासमवेत प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे यांनी केला. या वेळी जिल्ह्यातील शहापूर, मुरबाड व भिवंडी तालुक्यातील घरकुलांच्या कामांची पहाणी केली, तसेच पाहणी दौऱ्यादरम्यान लाभार्थ्यांशी संवाद साधून मनरेगाच्या कामाबाबतही लाभार्थ्यांशी चर्चा केली.
अपूर्ण घरकुलांची प्रमुख कारणे ः
घर बांधण्यास लाभार्थी प्रतिसाद देत नाहीत
वितरित केलेल्या कामाच्या रकमेच्या वसुलीची कार्यवाही सुरू
लाभार्थी कायमस्वरूपी स्थलांतरित किंवा मयत (वारसदार नाही)
वसुली होत नसल्याने मालमत्तेवर बोजा चढविण्याची कार्यवाही सुरू
अंजनूप ग्रामपंचायत (व तत्सम) डोंगराळ भागात असल्याने त्या ठिकाणी बांधकाम साहित्य नेण्यास अडचणी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

