मतदार याद्यांमध्ये गंभीर घोटाळे
मतदार याद्यांमध्ये गंभीर घोटाळे 
पोलिस पाळत ठेवत असल्याचा हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप
मुंबई, ता. ३१ : ‘निवडणूक आयोगाच्या विरोधात १ नोव्हेंबरला सर्वपक्षीय मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. मतदार याद्यांमधील घोटाळे हा गंभीर व चिंतेचा विषय असून, राहुल गांधी यांनी या प्रश्नाला सर्वात आधी वाचा फोडली व पुराव्यासह गडबड घोटाळे उघड केले. निवडणुका या निष्पक्ष व पारदर्शक पद्धतीने झाल्या पाहिजेत, ही सर्वांची मागणी आहे. या मोर्चाला काँग्रेस पक्षाचा पाठिंबा असून, मोर्चात काँग्रेस पक्षाचे नेते व कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.’ अशी माहिती कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शुक्रवारी (ता. ३१) दिली. दरम्यान, टिळक भवन येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत सकपाळ यांनी आपल्यावर पोलिस पाळत ठेवत असल्याचा आरोप केला.
सकपाळ म्हणाले की, ‘नाना चौकातील सर्वोदय आश्रमात पोलिस सातत्याने पाळत ठेवत आहेत. आज सकाळी एका साध्या वेशातील पोलिसाने थेट बेडरूममध्ये घुसून टेहळणी आणि चौकशी केली. हे आतापर्यंत तिसऱ्यांदा घडले आहे.’ कोणाच्या आदेशाने आमच्यावर पाळत ठेवली जात आहे, असा सवाल त्यांनी केला. पाळत ठेवणारा पोलिस यासाठी वरिष्ठांचे आदेश आहेत असे म्हणत वरिष्ठांना फोनवर बोला असे सांगत होता, अशा पद्धतीने विरोधी पक्षांच्या नेत्यांवर पाळत ठेवली जात आहे. यामागे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश आहेत का, असा प्रश्न उपस्थित करून विरोधकांवर पाळत ठेवण्याची भाजपची प्रवृत्ती आहे, आधी पेगॅसेस नंतर फोन टॅपिंग केले, आता थेट बेडरूमपर्यंत ते पोहोचले आहेत, परंतु अशा दडपशाहीला आम्ही भीक घालत नाही, असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
मुंबईतील एन्काउंटरवर अनेक प्रश्न	
पवई येथे पोलिसांनी रोहित आर्या नावाच्या व्यक्तीचा एन्काउंटर केला. या व्यक्तीने लहान मुलांना ओलीस ठेवले होते. हा प्रकार अत्यंत चुकीचा आहे, मुलांची सुटका महत्त्वाची होती, पण हे संपूर्ण प्रकरण ज्या पद्धतीने हाताळण्यात आले त्यावर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या वेळी ‘एनएसजी’चे पथक उपस्थित असताना पोलिसांनी गोळ्या झाडून त्याची हत्या करण्याचे कारण काय, तो व्यक्ती मनोरुग्ण आहे, असे सांगितले जात आहे, पण याच व्यक्तीने ‘स्वच्छ माझी शाळा’सारखे सरकारी उपक्रम राबिवले आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याबरोबर एकाच व्यासपीठावर तो उपस्थित होता. या घटनेची चौकशी झाली पाहिजे, असे हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.
गुन्हेगारांचा आका देवेंद्र फडणवीस
डॉ. संपदा मुंडे यांना दबावामुळे आत्महत्या करावी लागली, ही आत्महत्या नसून हत्या आहे. याप्रकरणी भाजपचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे नाव घेतले जात आहे. फडणवीस यांच्या काळात राज्यात गुन्हेगारी प्रवृत्ती बोकाळली असून, यात भाजपचे नेते पदाधिकारी यांची गुंडगिरी वाढली असून, या गुन्हेगारांचा आका देवेंद्र फडणवीस असल्याचा आरोप हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

