महापालिकेच्या महापौर बंगल्याला अवकळा
महापालिकेच्या महापौर बंगल्याला अवकळा
१५ वर्षांपूर्वी बांधलेल्या इमारतीला झाडाझुडपांचा विळखा
कल्याण, ता. १ (वार्ताहर) ः कल्याण-डोंबिवली महापालिकेने सुमारे १५ वर्षांपूर्वी कोट्यवधी रुपये खर्च करून बांधलेल्या महापौर बंगल्याला सध्या झाडाझुडपांचा विळखा पडला आहे. वाढलेले गवत आणि गंजलेल्या कुलुपांमुळे अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. जनतेच्या पैशातून उभी राहिलेली ही वास्तू महापालिकेच्या नियोजनशून्य कारभारामुळे धूळखात उभी आहे.
आधारवाडी कारागृहाजवळ २०१० मध्ये उभारलेल्या या इमारतीचे उद्घाटन तत्कालीन शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले होते; मात्र उद्घाटनानंतर त्वरितच हा बंगला कायदेशीर आणि प्रशासकीय वादात अडकला, ज्यामुळे अनेक महापौरांनी येथे वास्तव्य केले नाही. २०१८ मध्ये तत्कालीन महापौर वनिता राणे यांनी लाखो रुपये खर्च करून याचे नूतनीकरण केले आणि काहीकाळ निवास केला; परंतु त्यांच्या कार्यकाळानंतर ही इमारत पुन्हा प्रशासनाच्या पूर्ण दुर्लक्षाचे बळी ठरली.
बंगल्याची दुरवस्था
बंगल्याभोवती प्रचंड प्रमाणात झाडे आणि झुडपे वाढल्याने सुरक्षा रक्षकही आत जाण्यास कचरतात.
दरवाजे तुटलेले, कुलुपांना गंज आणि फरशीवर मातीचे थर साचले आहेत.
इमारतीमधील फर्निचरला वाळवी लागली असून, खिडक्यांच्या तावदानांना तडे गेले आहेत.
रात्रीच्या वेळी ही सरकारी मालमत्ता नशेबाज आणि समाजकंटकांचा अड्डा बनली असून परिसरात दारूच्या रिकाम्या बाटल्यांचा ढीग आढळतो.
हा बंगला केडीएमसीच्या निष्काळजीचे आणि सार्वजनिक विश्वासाच्या नुकसानीचे प्रतीक ठरला असून, विकासाच्या नावाखाली जनतेचा पैसा मातीमोल होत असल्याबद्दल नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे.
चौकशीचे आश्वासन
या गंभीर विषयावर महापालिकेचे उपायुक्त रमेश मसाळ यांनी केवळ चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहे; मात्र ही चौकशी कधी पूर्ण होईल, याबाबत साशंकता आहे. जाणकार करदात्या नागरिकांनी प्रशासनाने आपल्या मालमत्तांची डोळस दृष्टिकोन ठेवून देखभाल करावी आणि त्यांचे जतन करावे, अशी मागणी केली आहे.

