आनंदबाई जोशी प्रसूतिगृह नव्या रुपात
आनंदीबाई जोशी प्रसूतिगृह नव्या रूपात
१०० खाटांच्या रुग्णालयात रूपांतर; २२ कोटींचा निधी मंजूर
ठाणे, ता. १ ः वर्तकनगर परिसरातील मागील सात वर्षांपासून बंद असलेले आनंदीबाई जोशी प्रसूतिगृह आता नव्या आणि सुसज्ज रूपात उभे राहणार आहे. ठाणे महापालिकेच्या माध्यमातून या प्रसूतिगृहाचे १०० खाटांच्या (बेड) रुग्णालयात रूपांतर करण्यात येणार असून, यासाठी राज्य सरकारकडून तब्बल २२ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
२०१७ मध्ये लागलेल्या आगीत नुकसान झाल्यामुळे आनंदीबाई जोशी प्रसूतिगृह बंद करण्यात आले होते. येथील सेवा तात्पुरत्या स्वरूपात कोरस येथे हलविण्यात आल्या होत्या. सध्या ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयावर (कळवा) वाढता ताण लक्षात घेता, महापालिकेने शहरातील विविध भागांमध्ये टप्प्याटप्प्याने नवीन रुग्णालये उभारण्याचे नियोजन केले आहे. या नव्या रुग्णालयात अत्याधुनिक सुविधा आणि नव्याने बांधण्यात येणारा प्रसूती कक्ष (मॅटर्निटी वॉर्ड) उपलब्ध राहणार आहे.
अतिरिक्त निधीची गरज
प्रकल्पाचे काम टप्प्याटप्प्याने हाती घेण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात तळ मजला आणि तीन मजले बांधले जातील. दुसरा टप्प्यात चौथा व पाचवा मजला उभारण्यात येणार आहे. यासाठी आरोग्य विभागाने आणखी आठ कोटी रुपयांचा निधी आवश्यक असल्याचे सांगितले आहे. तिसरा टप्प्यात सहावा ते आठवा मजला उभारला जाईल. बांधकामासाठी कार्यादेश देण्यात आले असून, शहर विकास विभागाकडून प्लॅन मंजुरीची प्रक्रिया सुरू आहे.
प्रस्तावित सुविधा
मजला सुविधा
तळ मजला सिटीस्कॅन आणि रिसेप्शन एरिया
पहिला मजला ओपीडी, सोनोग्राफी, एक्स-रे, लॅब
दुसरा मजला जनरल वॉर्ड, ॲडमिन ऑफिस (प्रशासन कार्यालय)
तिसरा मजला मॅटर्निटी वॉर्ड (प्रसूती कक्ष), लेबर वॉर्ड आणि एनआयसीयू
चौथा मजला आयसीयू (ICU), ओटी (ऑपरेशन थिएटर), प्री आणि पोस्ट ऑपरेटिव्ह बेड
पाचवा ते आठ विविध वॉर्ड

