जोड रस्त्याच्या पुलाचे काम रखडले
जोड रस्त्याच्या पुलाचे काम रखडले
घाटकोपरमध्ये पाच वर्षांपासून दुर्लक्ष; रहिवाशांची गैरसोय
घाटकोपर, ता. ३ (बातमीदार) ः घाटकोपर पश्चिमेतील असल्फा परिसरात घाटकोपर अंधेरी लिंक रोडवरून चांदिवली-पवईकडे जाणाऱ्या रस्त्याला जोडणाऱ्या पुलाच्या पुनर्बांधणीचे काम तब्बल पाच वर्षांनंतरही अपूर्ण अवस्थेत आहे. या कामातील दिरंगाईमुळे परिसरातील नागरिकांना तसेच वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
महापालिकेने हा पूल धोकादायक घोषित करून सुमारे पाच वर्षांपूर्वी वाहतुकीसाठी बंद केला होता. त्यानंतर पुनर्बांधणीसाठी तो अर्धवट पाडण्यात आला, मात्र तब्बल दोन वर्षे त्या अवस्थेतच तो पडून राहिला. अखेर कामास सुरुवात झाली, पण ती कासवगतीने सुरू असल्याचे दिसून आले.
पुलाच्या बाजूला असलेल्या भूमिगत पाण्याच्या पाइपलाइनचे काम अनेक महिने सुरू राहिले आणि त्यात वेळोवेळी बदलही करण्यात आले. २० डिसेंबर २०२३ रोजी या मार्गावरील वाहतूक व बेस्ट बससेवा दोन महिन्यांसाठी (१५ फेब्रुवारीपर्यंत) बंद करण्यात आली होती; परंतु प्रत्यक्षात बससेवा पुन्हा सुरू होण्यासाठी सहा महिने लागले, म्हणजेच ४ जून २०२४ रोजीच ती पूर्ववत करण्यात आली. तरीदेखील पुलाचे काम आजतागायत पूर्ण झालेले नाही.
यानंतर काही महिन्यांनी पिलर बांधण्यात आले, मात्र केवळ तीन महिन्यांनंतर ते तोडून नव्या रचनेतील पिलर उभारण्यात आले. त्यानंतर काही काळ कामाला गती आल्याचे दिसून आले आणि भव्य लोखंडी गर्डर बसविण्यात आले, मात्र गेल्या दोन महिन्यांपासून काम पुन्हा पूर्णतः ठप्प आहे.
या ठिकाणी केलेले खोदकाम प्रवाशांसाठी धोकादायक ठरत असून, नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे, शिवाय या कामामुळे परिसरात सतत वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते आहे. या पुलाचे काम पूर्ण होणार तरी कधी, असा सवाल संतप्त नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
यासंदर्भात पालिकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही.
काम खूपच संथ गतीने सुरू आहे. पुलाच्या बाजूलाच ६० इंचाच्या पाणीपुरवठा करणाऱ्या दोन पाइपलाइन आहेत. त्या जीर्ण असल्याने कामाच्या दरम्यान फुटण्याची शक्यता आहे. त्यामुळे काम सावकाश सुरू आहे.
- किरण लांडगे, माजी नगरसेवक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

