तीन हात नाक्याची कोंडी
तीन हात नाक्याची कोंडी
उन्नत रस्त्याच्या कामाचा अडथळा; वाहतूक पोलिसांचा २४ तास पहारा
ठाणे शहर, ता. ३ (बातमीदार) : ठाण्यातील तीन हात नाका वाहतूक कोंडीचा नाका म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी नऊ रस्ते एकमेकांना मिळतात. त्यामुळे येथील वाहतूक कोंडी नियंत्रणात ठेवण्यासाठी वाहतूक विभागाला तारेवरची कसरती करावी लागत असतानाच येथे यू- आकाराचा उन्नत रस्ता बांधण्यासाठी खोदकाम करण्यात आले आहे. या कामामुळे येथील वाहतूक कोंडीत आणखी भर पडली असून, ती कोंडी नियंत्रणात ठेवण्यासाठी वाहतूक विभागाला पोलिसांची फौज उभी करावी लागली आहे.
मुंबई-नाशिक महामार्ग, मुंबई-आग्रा महामार्ग आणि मुंबई-गुजरात महामार्गाचे जंक्शन म्हणून ठाण्यातील तीन हात नाका परिसर ओळखला जातो. शहरातील सर्वात जास्त वाहनांची वाहतूक या भागातून होते. त्यामुळे येथील वाहतुकीचे नियोजन कारण्यासाठी पोलिसांना २४ तास पहारा द्यावा लागतो. सध्या या भागात मेट्रो आणि उन्नत रस्त्याची कामे सुरू असल्याने कोंडीत आणखी भर पडली आहे. मुलुंड चेकनाका (आग्रा रोड) मार्गे वडवली कडे जाणाऱ्या मेट्रो लाइनचे काम बऱ्यापैकी झालेले असले तरी उन्नत रस्त्यासाठी येथे यू आकाराचा पूल बांधला जात आहे. त्या पुलाचा पाया खोदला जात असून, खड्ड्यात पुलासाठी पिलर उभे केले जात आहेत. या कामामुळे आग्रा रोड आणि आनंद नगर टोलमार्गे ठाण्यात येणाऱ्या वाहनांची कोंडी होत आहे.
मुंबई-नाशिक आणि गुजरातकडे जाणाऱ्या वाहनांसाठी उड्डाणपुलाचा वापर होत असला तरी ठाण्यात येणारी वाहने पुलाखालील रस्त्याचा वापर करतात. त्याचप्रमाणे ठाणे रेल्वेस्थानकातून वागळे इस्टेट एमआयडीसी, आयटी पार्क, कामगार न्यायालय, अन्न व औषध विभाग, प्रादेशिक परिवहन आणि पासपोर्ट कार्यलयाकडे जाणारा कर्मचारी वर्गसुद्धा रिक्षा, बस आणि खासगी वाहनाने येथूनच पुढे जात असल्याने येथे सतत कोंडी होत असते. आता उन्नत रस्त्याच्या कामामुळे कोंडीत भर पडली असून, कामाची गती वाढवून हा भाग लवकर कोंडीमुक्त करण्याची गरज निर्माण झाल्याचे वाहनचालकांचे म्हणणे आहे.
जाणारे मार्ग :
मुख्य मार्ग - मुंबई, नाशिक, पालघर, गुजरात
अंतर्गत मार्ग - ठाणे स्थानक, वागळे इस्टेट (एमआयडीसी), आरटीओ (सेवा रस्ता), सत्र न्यायालय, जिल्हाधिकारी कार्यालय
सुरू असलेली कामे
रिंग मेट्रो, उन्नत मार्ग
सिग्नलची गर्दी
या ठिकाणी विविध रस्त्याने जाण्यासाठी नऊ मार्ग असून, प्रत्येक मार्गासाठी सिग्नल यंत्रणा आहे. त्यामुळे सगळ्यात सिग्नल सुटण्यासाठी जास्त वेळ लागतो.
बेशिस्त चालक
स्टेशनकडे प्रवासी वाहतूक करणारे बहुतांश रिक्षाचालक बेशिस्तीचे वर्तन करतात. स्थानिक दुचाकीचालक रॅश ड्रायव्हिंग करतात. त्यामुळे अपघाताचा जादा धोका असतो.
फोटो : तीन हात नाका येथे दुर्गती मार्ग आणि आग्रा रोडवर उन्नत पुलासाठी सुरू असलेली कामे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

