मोदी भेटीतून चव्हाणांचा राजकीय मास्टरस्ट्रोक

मोदी भेटीतून चव्हाणांचा राजकीय मास्टरस्ट्रोक

Published on

मोदी भेटीतून चव्हाणांचा ‘मास्टरस्ट्रोक’
ठाण्यात भाजप-शिंदे गटात सत्तासंघर्ष
डोंबिवली, ता. ३ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रत्यक्ष भेटण्याचे भारतीय जनता पक्षाच्या निवडक कार्यकर्त्यांचे स्वप्न भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रयत्नांमुळे पूर्ण झाले आहे. मुंबई विमानतळावर मोदींचे स्वागत करण्यासाठी डोंबिवलीतील स्थानिक कार्यकर्त्यांना संधी देण्यात आली. हा निर्णय वरकरणी सामान्य कार्यकर्त्यांचा सन्मान असला, तरी या भेटीमागे चव्हाण यांची राजकीय खेळी आणि ठाणे जिल्ह्यातील शिंदे गटाशी सुरू असलेला सूक्ष्म सत्तासंघर्ष चर्चेत आला आहे.

ठाणे जिल्हा हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जातो तसेच त्यांचे पुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे कल्याण लोकसभा क्षेत्रात मोठे वर्चस्व आहे. या पार्श्वभूमीवर डोंबिवलीतील कार्यकर्त्यांना थेट मोदींपर्यंत पोहोचवून रवींद्र चव्हाण यांनी भाजपची स्वतंत्र संघटन क्षमता आणि ताकद दाखवण्याचा प्रयत्न केल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती समजले जाणारे चव्हाण प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी ठाणे जिल्ह्यातील भाजपचे संघटन पुन्हा मजबूत केले. त्यांनी कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधला आणि निर्णय प्रक्रियेचा केंद्रबिंदू ठाणे-डोंबिवलीकडे वळवला. पंतप्रधान मोदी भेटीची संधी हा त्यांच्या याच राजकीय डावाचा भाग असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

महापालिका निवडणुकीची तयारी
महापालिका निवडणुकांच्या तोंडावर चव्हाण यांची ही हालचाल शक्तिप्रदर्शन म्हणून पाहिली जात आहे. भाजप कार्यकर्त्यांची निष्ठा आणि संघटनशक्ती स्वबळावर ठाम आहे. तसेच ठाणे जिल्ह्यात शिंदे गटाला भाजप वरचढ ठरत असल्याचे दोन ठळक संदेश दिले गेले आहेत. ही भेट केवळ कार्यकर्त्यांसाठीचा सन्मान नसून, भाजप स्वतंत्रपणे लढू शकते हा स्पष्ट संदेश शिंदे गटाला देणारा राजकीय इशारा आहे. महापालिका रणशिंगापूर्वीची ही संघटन तपासणी असून, येत्या काळात याचा प्रभाव उमेदवारांची निवड आणि स्थानिक नेतृत्वावर दिसण्याची शक्यता आहे.

सत्ता समीकरण
ठाणे जिल्हा हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पारंपरिक प्रभावक्षेत्र आहे; मात्र गेल्या काही महिन्यांत भाजपने संघटनात्मक ताकद वाढवण्यावर भर दिला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर रवींद्र चव्हाण यांनी ठाणे, कल्याण, डोंबिवली या भागांत थेट कार्यकर्त्यांशी संपर्क आणि मोहिमा सुरू केल्या आहेत. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांमध्ये उमेदवार आणि नेतृत्वावरील ताण वाढू लागला आहे. मोदी भेटीची संधी देऊन चव्हाण यांनी भाजप स्वतंत्रपणे लढू शकते हा संदेश शिंदे गटाला दिल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com