केंद्रीय सचिवांकडून क्लस्टरचा सखोल आढावा
केंद्रीय सचिवांकडून क्लस्टरचा सखोल आढावा
१५६ सहकारी संस्थांशी थेट संवाद; एकात्मिक विकासासाठी नवे दिशादर्शन
अलिबाग, ता. ३ (वार्ताहर) ः मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाचे केंद्रीय सचिव डॉ. अभिलक्ष लिखी यांनी रायगड जिल्ह्यातील मत्स्यव्यवसाय क्लस्टरचा सखोल आढावा घेत १५६ प्राथमिक मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांच्या प्रतिनिधींशी थेट संवाद साधला. जिल्हा नियोजन सभागृहात नुकत्याच झालेल्या या बैठकीत रायगडमधील मत्स्यव्यवसायाच्या सर्वांगीण विकासासाठी नवे दिशादर्शन करण्यात आले.
या क्लस्टरचा उद्देश एकात्मिक मत्स्यव्यवसाय मूल्यसाखळी निर्माण करून शेतकऱ्यांच्या आणि मच्छीमारांच्या उपजीविकेला बळकटी देणे हा आहे. डॉ. लिखी यांनी सांगितले की, रायगड जिल्ह्यातील मत्स्यव्यवसाय हा देशाच्या अर्थचक्राचा महत्त्वाचा घटक असून, सहकार पद्धतीने या क्षेत्राचा विकास करणे हे सरकारचे प्राधान्य आहे. त्यांनी प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना व मत्स्यव्यवसाय पायाभूत सुविधा विकास निधी या योजनांशी क्लस्टर उपक्रमांना जोडण्याची आवश्यकता अधोरेखित केली.
या बैठकीत १५६ प्राथमिक मत्स्यव्यवसाय संस्था आणि नऊ मत्स्य शेतकरी उत्पादक संस्थांचे सुमारे २५० प्रतिनिधी सहभागी झाले होते. डॉ. लिखी यांनी राष्ट्रीय मत्स्यव्यवसाय विकास मंडळाला जिल्ह्यात जागरूकता, प्रशिक्षण आणि तक्रार निवारण शिबिरे आयोजित करण्याचे निर्देश दिले. तसेच निर्यातवाढ, आर्थिक उपलब्धता, बाजारपेठ जोडणी आणि पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाधारित कार्यपद्धती स्वीकाराव्यात, असे आवाहनही त्यांनी हितधारकांना केले. त्यांनी सांगितले की, ही भेट केवळ आढावा बैठक नसून त्रुटी शोधण्यासाठी आणि गरजेनुसार हस्तक्षेप करण्यासाठी सल्लामसलत नियोजन प्रक्रियेची सुरुवात आहे. हितधारकांनी मांडलेल्या समस्यांना आणि विकासाच्या गरजांना प्राधान्य दिले जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. बैठकीला जिल्हाधिकारी किशन जावळे, मत्स्यव्यवसाय आयुक्त किशोर तावडे, तसेच रायगड, उरण, श्रीवर्धन, मुरूड, करंजा, रोहा, पेण यांसह विविध तालुक्यांतील मच्छीमार सहकारी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. एकात्मिक विकासाचा मार्ग शोधणारी ही बैठक रायगड जिल्ह्यातील मत्स्यव्यवसाय क्षेत्रासाठी नवे पर्व ठरेल, असा विश्वास सहभागींकडून व्यक्त करण्यात आला.
.........................
ऑनलाइन मार्गदर्शन
या कार्यक्रमाला मत्स्यव्यवसाय विभागाचे संयुक्त सचिव (आंतरदेशीय मत्स्यव्यवसाय) सागर मेहरा यांनी ऑनलाइन मार्गदर्शन केले. त्यांनी मंत्रालयांतील योजनांमध्ये समन्वय आणि अभिसरणाची आवश्यकता अधोरेखित केली. संयुक्त सचिव (समुद्री मत्स्यव्यवसाय) नीतू कुमारी यांनी बंदर व्यवस्थापनासाठी प्रमाणित कार्यपद्धती तयार करण्यावर भर दिला. राष्ट्रीय मत्स्यव्यवसाय विकास मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. के. बेहेरा यांनी रायगड जिल्ह्याच्या मत्स्यव्यवसाय स्थितीचा आणि पुढील पाच वर्षांतील विकास आराखड्याचा आढावा सादर केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

