निवडणूक खर्चासाठी कसरत

निवडणूक खर्चासाठी कसरत

Published on

निवडणूक खर्चासाठी कसरत
आयोगाकडून ११ लाखांची मर्यादा, इच्छुकांचे बजेट कोटींमध्ये
वाशी, ता. ३ (बातमीदार)ः स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने उमेदवारांसाठी खर्चमर्यादा दीडपट वाढवली आहे. या निर्णयामुळे नवी मुंबई महापालिकेतील नशीब आजमावणाऱ्या उमेदवाराला ११ लाख खर्चाची मर्यादा असणार आहे, परंतु निवडणुकांच्या आचारसंहितेआधीच मतदारांवर लाखोंच्या भेटवस्तूंची उधळण केली जात असल्याने इच्छुकांना कसरत करावी लागणार आहे.
नवी मुंबई महापालिकेची निवडणूक काही उमेदवारांसाठी प्रतिष्ठेची तसेच अस्तित्वाची ठरणार आहे. साडेदहा वर्षांच्या कालावधीनंतर होणाऱ्या निवडणुकीत निवडून येण्यासाठी कोट्यवधींची उधळण करण्याची तयारी उमेदवारांनी केली आहे. सहा वर्षांपासून निवडणुका होणार म्हणून इच्छुक उमेदवारांनी महिलांसाठी हळदी-कुकू समारंभ, खैळ पैठणीचा, देवदर्शन सोहळे, दिवाळीमध्ये फराळवाटप, गणेशोत्सवामध्ये साहित्यवाटपातून लाखो रुपये खर्च करून मतदारांना खूश ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. २०२० मध्ये निवडणुका होणार होत्या, पण कोरोना, त्यानंतरच्या राजकीय संघर्षामुळे निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या. त्यामुळे मतदारांना खूश करण्यासाठी आता आयोगाने घातलेली खर्च मर्यादा कागदावरच राहणार आहे.
------------------------------------
जिंकण्यासाठी काहीपण
- गेल्या वेळी महापालिकेसाठी पाच लाखांची खर्च मर्यादा होती. त्या वेळी उमेदवारांनी जिंकण्यासाठी कोटींचा आकडा पार केला होता. त्यात आता १० वर्षांनी निवडणूक होत असल्याने खर्चाची मर्यादा वाढवली आहे.
- महागाई, प्रचार साधनांचे दर, डिजिटल माध्यमांवरील खर्च, वाहनभाडेचा अभ्यास करून आयोगाने खर्चवाढीचा निर्णय घेतला. राजकीय पक्षांकडून जिंकण्याची रणनीती आखताना पाण्यासारखा पैसा खर्च केला जाणार आहे.
---------------------------
लाखोंच्या भेटवस्तूंची उधळण
निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या मर्यादेनुसार एका चार सदस्यीय प्रभागात एका पक्षाच्या चार उमेदवारांना ४४ लाखांचा खर्च करता येणार आहे, परंतु दिवाळीतच इच्छुकांनी मतदारांवर लाखोंच्या भेटवस्तूंची उधळण केली आहे, तर एका उमेदवारानेच प्रभागासाठी प्रत्येकी दीड ते दोन कोटींचे बजेट राखीव ठेवले आहे. त्यामुळे एकाच पक्षाच्या पॅनेलकडून चार ते आठ कोटींचा खर्च होण्याचा अंदाज राजकीय वर्तुळात सुरू आहे.
़़़़़़़़़़़़़़़़़़़़़ः--------------------------------------------------
उमेदवारांच्या खर्च मर्यादेत वाढ
निवडणूक आयोगाकडून आठ वर्षांनी मंजुरी
पनवेल, ता. ३ (बातमीदार)ः निवडणूक आयोगाने उमेदवारांसाठी निश्चित केलेला खर्च आणि प्रत्यक्षातील खर्चात महागाईमुळे तफावत येत असल्याने राजकीय पक्ष, उमेदवारांनी खर्चात वाढ करण्याची मागणी केली होती. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक खर्चाची मर्यादा तब्बल आठ वर्षांनी वाढविली आहे. त्यामुळे उमेदवारांना दिलासा मिळणार आहे.
गेल्या काही वर्षांत महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ग्रामीण भागातील उमेदवारांना मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी वाहन, अन्य खर्च मोठ्या प्रमाणात होत होता, मात्र निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या खर्च मर्यादेमुळे उमेदवारांची मोठी कुचंबणा होत होती. संबंधित खर्चात निवडणूक आयोगाने दिलेली खर्च मर्यादा आणि प्रत्यक्ष होणाऱ्या खर्चात तफावत होती. त्यामुळे त्याचा ताळमेळ घालताना नाकीनऊ येत होते. त्यामुळे राजकीय पक्ष, उमेदवारांनी खर्चात वाढ करून देण्याची मागणी आयोगाकडे केली होती. त्याचा विचार करून तब्बल आठ वर्षांनी आयोगाने खर्चाच्या मर्यादेत वाढ केली आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांना दिलासा मिळाला आहे. नव्या रचनेमुळे जिल्हा परिषद सदस्यांना नऊ लाख रुपये, पंचायत समिती सदस्यांसाठी सहा लाख रुपये, अ वर्गातील नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी १५ लाख रुपये, नगरसेवकपदासाठी पाच लाखांपर्यंतची मर्यादा आहे.
---------------------------------
अशी असेल नवी खर्च मर्यादा
नगरपालिका नगर पंचायत
पालिका वर्ग अ
नगराध्यक्ष उमेदवार १५ लाख
सदस्य उमेदवार पाच लाख

वर्ग ब नगराध्यक्ष उमेदवार ११ लाख २५ हजार
सदस्य उमेदवार तीन लाख ५० हजार

वर्ग क
नगराध्यक्ष उमेदवार सात लाख ५० हजार सदस्य उमेदवार दोन लाख ५० हजार

नगर पंचायत
नगराध्यक्ष उमेदवार सहा लाख रुपये
सदस्य उमेदवार दोन लाख २५ हजार

जिल्हा परिषद पंचायत समिती
सदस्य संख्या ७१ ते ७५
जिल्हा परिषद उमेदवार खर्च
नऊ लाख रुपये

पंचायत समिती उमेदवार खर्च
सहा लाख रुपय

सदस्य संख्या ६१ ते ७०
जिल्हा परिषद उमेदवार सात लाख ५० हजार
पंचायत समिती उमेदवार पाच लाख २५ हजार

सदस्य संख्या ५० ते ६०
जिल्हा परिषद उमेदवार सहा लाख
पंचायत समिती उमेदवार चार लाख ५० हजार

ग्रामपंचायत
सदस्य संख्या सात ते नऊ सदस्य
थेट सरपंच खर्च ७५०००
सदस्य खर्च ४००००

११ ते १३ सदस्य
थेट सरपंच खर्च एक लाख ५० हजार
सदस्य खर्च ५५०००

१५ ते १७ सदस्य
थेट सरपंच खर्च दोन लाख ६५ हजार
सदस्य खर्च ७५०००

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com