मतदार यादीच्या गोंधळाने बदलापूरकरांमध्ये संताप
मोहिनी जाधव : सकाळ वृत्तसेवा
बदलापूर, ता. ३ : बदलापूर नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार यादीतील गोंधळाने मतदारांचा संताप उसळला आहे. आपल्या प्रभागात राहूनही मतदानासाठी शेजारच्या प्रभागात जावे लागते, अशी स्थिती अनेक मतदारांवर ओढवली आहे. शहरात सध्या ‘इकडचा मतदार तिकडे, तिकडचा इकडे’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यासाठी अनेकांनी प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली आहे.
गांधीनगरातील पॅनल क्रमांक ६ मध्ये राहणारे राम जगताप यांच्या कुटुंबातील पाच सदस्यांची नावे पूर्वेकडील पॅनल क्रमांक १४, ठाकूरवाडी प्रभागात आढळली. तर बेलवलीतील अविनाश देशमुख यांचे नाव पॅनल क्रमांक ५ ऐवजी क्रमांक ६ मध्ये गेले. या बदलांमुळे मतदारांना आपला प्रतिनिधी कोण? आम्ही मतदान कोणाला करायचे, असा प्रश्न भेडसावत आहे. काहींची नावे दुरुस्त झाली असली तरी काहींचे अस्तित्वच गायब झाले आहे, अशी तक्रार नागरिकांनी केली आहे.
‘मतदानाचा अधिकारच गहाळ’
आम्ही ज्या भागात राहतो, तिथल्या उमेदवाराला मतदान करायचं की शेजारच्या? आणि समस्या कुणाकडे मांडायच्या, असा सवाल अविनाश देशमुख आणि राम जगताप यांनी उपस्थित केला. या गोंधळामुळे नागरिकांचा मतदानाचा मूलभूत अधिकारच बाधित झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
राजकीय पक्षही एकमताने अस्वस्थ
विशेष म्हणजे, या गोंधळावर विरोधकांबरोबरच सत्ताधारी पक्षाच्या स्थानिक नेत्यांनीही मतदार यादीतील त्रुटी मान्य केल्या आहेत. यामुळे निवडणुकीपूर्वीच बदलापूरमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पारदर्शकतेची मागणी
मतदारांच्या या नाराजीतून एकच मागणी पुढे येत आहे. मतदार यादीत पारदर्शकता आणा आणि त्यानंतरच निवडणुका घ्या.” निवडणूक आयोगाने तातडीने तपासणी करून अचूक यादी प्रसिद्ध करावी, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे.
बदलापूरकरांना आता केवळ मतदानाचा अधिकार वापरण्याचीच नव्हे, तर स्वतःचा प्रभाग आणि उमेदवार शोधण्याचीही वेळ आली आहे आणि हाच मुद्दा लोकशाहीच्या विश्वासार्हतेला आव्हान ठरतो आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

