राज्यात सर्वसामान्यांना २५ वर्षे माेफत वीज
राज्यात सर्वसामान्यांना २५ वर्षे माेफत वीज
१०० युनिटपर्यंत दिलासा; स्मार्ट योजनेसाठी महावितरणचा पुढाकार
मुंबई, ता. ३ : दारिद्र्यरेषेखालील आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना २५ वर्षे माेफत वीजपुरवठा करण्यासाठी महावितरणने पुढाकार घेतला आहे. यासाठी स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफ टाॅप (स्मार्ट) याेजनेंतर्गत प्रत्येक घरावर एक किलाेवॉट क्षमतेचा साैरऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या अनुदानामुळे या योजनेतील लाभार्थी ग्राहकांवरील आर्थिक भार खूप कमी हाेणार आहे, अशी माहिती महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी दिली.
महावितरणच्या नुकत्याच झालेल्या संचालक आणि मुख्य अभियंत्यांच्या राज्यस्तरीय बैठकीत या योजनेच्या अंमलबजावणीबाबत सूचना देण्यात आल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारने प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना सुरू केली आहे. त्यामध्ये ग्राहकांना एक किलोवॉटचा छतावरील सौरऊर्जा प्रकल्प बसविण्यासाठी ३० हजार रुपये अनुदान केंद्र सरकार देते. स्मार्ट योजनेत या अनुदानाबराेबरच दारिद्र्यरेषेखालील ग्राहकांना राज्य सरकार १७,५०० रुपये अनुदान देणार आहे.
तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटासाठी केंद्र सरकारच्या अनुदानाखेरीज राज्य सरकार सर्वसाधारण ग्राहकांना १० हजार रुपये, तर अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या ग्राहकांना १५ हजार रुपये अनुदान देणार आहे. त्यामुळे १०० युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या ग्राहकांना स्वतःची गरज भागवून अतिरिक्त वीज महावितरणला विकता येणार आहे. या प्रकल्पातून २५ वर्षे वीजनिर्मिती होत असल्याने तेवढा काळ त्यांना माेफत वीज मिळणार आहे.
-----
काय आहे स्मार्ट याेजना?
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्य सरकारने स्मार्ट योजना सुरू केली आहे.
- १०० युनिटपेक्षा कमी वीज वापर असलेल्या दारिद्र्यरेषेखालील १.५४ लाख, तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल ३.४५ लाख वीज ग्राहकांना लाभ
- याेजनेसाठी ६५५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, अतिरिक्त वीज विकून उत्पन्न मिळवता येणार आहे.
- प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर ही याेजना राबविण्यात येणार आहे.
------
किती मिळणार अनुदान?
केंद्र सरकार
३०,००० रुपये
राज्य सरकार
दारिद्र्यरेषेखालील ग्राहक : १७,५०० रुपये
आर्थिकदृष्ट्या दुर्बल :
सर्वसाधारण : १०,००० रुपये
अनुसूचित जाती-जमाती : १५,००० रुपये
------
साैरऊर्जा प्रकल्पाविषयी
क्षमता : एक किलोवॉट
वीजनिर्मिती : १२० युनिट (दरमहा)
कालावधी : २५ वर्षे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

