मुंबईतील मराठी माणसांसाठी स्वयं-समूहपुनर्विकास योजना गेमचेंजर ठरणार

मुंबईतील मराठी माणसांसाठी स्वयं-समूहपुनर्विकास योजना गेमचेंजर ठरणार

Published on

मराठी माणसांसाठी स्वयंपुनर्विकास गेमचेंजर

‘सकाळ संवाद’मध्ये प्राधिकरणाचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांचा विश्वास

मुंबई, ता. ३ : मध्यमवर्गीयांच्या अनेक वसाहतींच्या स्वयं-समूह पुनर्विकासामुळे आलिशान आणि प्रशस्त घरे उपलब्ध हाेत आहेत. उच्चभ्रू वसाहतींमध्येच मिळणाऱ्या साेयी-सुविधा सर्वसामान्यांना उपलब्ध हाेत आहेत. चाळी आणि जुन्या इमारतींत राहणाऱ्या मराठी माणसाचे प्रशस्त घराचे स्वप्न साकार होणार असल्यामुळे ताे मुंबईत टिकून राहील. हा प्रकल्प मराठी माणसांसाठी गेमचेंजर ठरणार आहे, असा विश्‍वास स्वयं-समूह पुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी सोमवारी ‘सकाळ संवाद’ या कार्यक्रमात व्‍यक्त केला.

स्वयं-समूह पुनर्विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर प्रवीण दरेकर यांनी ‘सकाळ’शी पहिल्यांदाच संवाद साधला. या वेळी त्यांनी स्वयंपुनर्विकास, सहकार, जिल्हा बॅँक अशा विविध विषयांवर अभ्यासपूर्ण मते मांडली. प्रवीण दरेकर म्हणाले, ‘मुंबईतील मराठी माणसासाठी, मराठी माणूस येथेच टिकण्यासाठी, मराठी माणसाला ताकद देण्यासाठी फक्त बोलून चालत नाही, तर तशी कृती करायला हवी. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना बीडीडी चाळी, अभ्युदयनगर यांच्या पुनर्विकासाच्या फायली पुढे सरकल्या नाहीत. ते काम देवेंद्र फडणवीस यांनी केले.’

पार्ल्यातील नंदादीप सोसायटीबाबतचा त्यांचा अनुभवही त्यांनी या वेळी सांगितला. ‘विकसक ३६० चौरस फुटांच्या घराला ७०० चौरस फूट देत होता. तिथे स्वयंपुनर्विकासात त्यांना १४०० चौरस फूट मिळाले. त्यामुळे तेथेच एकत्र कुटुंबात राहण्याचा निर्णय घेतलेल्या एका मराठी भगिनीच्या डोळ्यातील आनंदाश्रू पाहून आपल्याला विलक्षण आनंद झाला,’ अशी आठवण त्यांनी सांगितली.

‘मध्य मुंबईतील मराठी वस्ती, गिरगावमधील पागडीची घरे यांनाही या योजनेचा फायदा मिळेल. मुंबईतील एसआरए योजनांनाही स्वयंपुनर्विकास योजनेत सहभागी करावे, अशी शिफारस केली आहे. मुंबईत पागडीच्या इमारती, केंद्राच्या जमिनीवरील तसेच राज्याचा जमिनीवरील इमारती, महसूलच्या जमिनी यांचे विषय वेगवेगळे आहेत. स्वयंपुनर्विकासासंबंधीच्या माझ्या अहवालात मी या सर्व विषयांवर उपाय दिले आहेत. या अहवालावर सहकार कृती अहवाल देईल, असेही दरेकर म्हणाले.

---
‘ती’ संकल्पना मुख्यमंत्र्यांची!
मी केवळ स्वयंपुनर्विकास योजनेची संकल्पना मांडली हाेती; मात्र त्या पुढे जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वयं-समूह पुनर्विकासाची संकल्पना मांडली. त्यामुळे या योजनेचे श्रेय त्यांना द्यावे लागेल. स्वयंपुनर्विकास योजनेतील चारकोप येथील श्वेतांबर साेसायटीच्या चावीवाटपासाठी देवेंद्र फडणवीस यांना बोलावले असता त्यांनी तेथे स्वयं-समूह पुनर्विकासाची कल्पना मांडली. अनेक वसाहतींचे क्लस्टर केल्यास केवळ उभ्या झोपडपट्ट्या निर्माण होणार नाहीत, असे त्यांनी लक्षात आणून दिले.
-----
इतर प्राधिकरणांनाही सहभागी करणार!
समूह पुनर्विकासासाठी राज्यभरातून मागणी हाेत आहे. सिडकोसह अन्य प्राधिकरणांसाेबत आम्ही बैठकाही सुरू केल्या आहेत. त्यांनाही यात सहभागी करून घेऊ. ठाण्यातही समूह पुनर्विकासाचा विषय यशस्वी होऊ शकतो, असेही त्यांनी सांगितले. यासंदर्भातील जीआर मुंबईसाठीच आहेत. यातील सवलती इतर विभागांनाही लागू करण्याचा निर्णय झाला आहे. त्याची अंमलबजावणीही लगेच होईल, असे दरेकर म्हणाले.
----
‘झाेपु’बाबत अहवालात शिफारस
झाेपडपट्टी पुनर्विकासअंतर्गत इमारतींच्या स्वयंपुनर्विकासालाही संमती द्या, अशी शिफारस अहवालात केली आहे. दादरच्या सुंदर नगर एसआरए इमारतीचे भूमिपूजन स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी केले होते. ते प्रकरण आता सॅम्पल केस म्हणून आम्ही घेत आहोत. अशाच प्रकारे समूह पुनर्विकासाचे एक प्रकरण घेऊ. अशाने त्या त्या विषयातील एक मॉडेल (उदाहरण) निश्चित करण्यात येणार आहे. आपण राज्य सरकार, केंद्र सरकार, महसूल यांच्या जमिनीवरही एक एक प्रोजेक्ट तयार करून त्याचा आदर्श सर्वांसमोर ठेवू, असाही आराखडाच दरेकर यांनी मांडला.
-----
याेजनेतील घुसखाेरांवर कारवाई!
स्वयंपुनर्विकास योजनेचे लाभ घेण्यासाठी अनेक बिल्डर कंत्राटदाराचा कोट चढवून साेसायटीतील काही सदस्यांमार्फत या याेजनेत घुसण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्ही त्यांच्यावर कारवाईचे आदेश दिले आहेत. या योजनेसाठी बिल्डर लॉबीशी वैर घेऊन जीव धोक्यात घातला आहे; मात्र मराठी माणसाला मुंबईत तिप्पट मोठे घर मिळाल्यावर त्याच्या डोळ्यातील आनंदाश्रू हे माझे मोठे समाधान आहे, असेही दरेकर म्हणाले.
----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com