कामोठ्यातील नागरिकांचे पाण्याविना हाल
कामोठ्यातील नागरिकांचे पाण्याविना हाल
भोकरपाडा जलवाहिनी दुरुस्तीमुळे दोन दिवस पाणीपुरवठा ठप्प; नागरिक त्रस्त
कामोठे, ता. ४ (बातमीदार) : नवी मुंबई महानगरपालिकेने भोकरपाडा जलवाहिनीवर देखभाल-दुरुस्तीची कामे हाती घेतल्यामुळे कामोठे नोडमध्ये मंगळवार (ता. ४) आणि बुधवार (ता. ५) रोजी पाणीपुरवठा पूर्णपणे बंद ठेवण्यात आला आहे. या निर्णयामुळे नागरिकांना तीव्र पाण्याअभावी हाल सहन करावे लागत आहेत. गुरुवारी (ता. ६) कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू होणार असल्याने नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
कामोठे नोडला दररोज ४२ एमएलडी पाण्याची आवश्यकता असते. परंतु, गेल्या काही वर्षांपासून अपुऱ्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न कायम असून, ही समस्या आता अधिकच तीव्र झाली आहे. दोन दिवसांचा पाणीपुरवठा बंद असल्याने नागरिकांना खासगी टँकरचे पाणी विकत घ्यावे लागते. परिणामी गृहनिर्माण संस्थांवर आर्थिक भार वाढला आहे. अनेक ठिकाणी घरगुती कामे, स्वयंपाक, धुणीभांडी आणि नोकरी-व्यवसायासाठी बाहेर जाण्याचे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे. दरम्यान, वृंदावन पार्क सेक्टर ३४ येथील रहिवासी सुरेश सडोलीकर म्हणाले की, पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याने नागरिकांना खाजगी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे सर्वसामान्य गृहनिर्माण संस्थांवर मोठा आर्थिक बोजा पडत आहे. सिडको आणि पनवेल महापालिकेने पाणीटंचाई दूर करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे आहे. नागरिकांच्या वाढत्या तक्रारी आणि पाण्यावरील अवलंबित्व लक्षात घेता, प्रशासनाने जलपुरवठा व्यवस्थापनात दीर्घकालीन सुधारणा करणे अत्यावश्यक ठरल्याचे सांगण्यात येत आहे.
..........
टँकरसाठी नाममात्र शुल्क
कामोठ्यातील मोठ्या सोसायट्यांमध्ये ८० टँकर पाण्याची मागणी असताना केवळ ४० टँकरपुरवठाच होत असल्याने नागरिकांना पाण्यासाठी अक्षरशः धावपळ करावी लागत आहे. सिडकोकडून टँकरच्या वाहतूक शुल्काचा भार टाळण्यात आला असला तरी सरासरी १२५ रुपये प्रति टँकर एवढे नाममात्र शुल्क आकारले जात आहे, अशी माहिती सिडकोचे पाणीपुरवठा अधिकारी प्रफुल्ल देवरे यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

