उपाययोजना करूनही गायमुख घाटात खड्डे
उपाययोजना करूनही गायमुख घाटात खड्डे
घोडबंदर रस्त्यावर सततची कोंडी
ठाणे शहर, ता. ९ (बातमीदार) ः सार्वजनिक बांधकाम विभागाकडून घोडबंदर मार्गावरील गायमुख घाटाची वारंवार दुरुस्ती होत आहे; मात्र घाटाची खड्ड्यातून मुक्ती होताना दिसत नाही. त्यामुळे केवळ पावसाळ्यातच नव्हे तर इतर ऋतूंतही हा घाट वाहतुकीसाठी अयोग्य झाला आहे. घाटावरील वाहनांची वाहतूक बैलगाडीच्या वेगाने चालत असल्याने केवळ ठाणे, मुंबईलाच नव्हे, तर गुजरात, पालघरला त्याचा फटका बसत आहे. घोडबंदर परिसरातील रहिवाशांना तर नेहमीच कोंडीचा सामना करावा लागतो.
वाहनांचे मोठे नुकसान होत असून खड्ड्यांमुळे कंटेनरमधून वाहतूक केला जाणारा माल वेळेत इच्छितस्थळी पोहोचत नाही. त्यामुळे कंपनी आणि व्यापाऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. गायमुख घाट संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामधून जातो. दुहेरी वाहतुकीचा हा घाट चुकीच्या पद्धतीने बांधला गेला असल्याने त्याच्यावर सतत खड्ड्यांचे साम्राज्य असते. काही दिवसांपूर्वीच त्याची दुरुस्ती झालेली असतानाही पुन्हा खड्डे पडले आहेत. त्यामुळे सकाळ, संध्याकाळी मोठी वाहतूक कोंडी होते. रात्री या घाटामधून खड्ड्यांमुळे धीम्या गतीने जड-अवजड वाहनांची वाहतूक सुरू असल्याने या कोंडीचा फटका माजिवड्यापर्यंत बसतो. घोडबंदर परिसरात तर नेहमीच वाहतूक कोंडी असते.
चुकीच्या पद्धतीने काम
घाटाचे चढण आणि वळण चुकीच्या पद्धतीने तयार करण्यात आल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे म्हणणे आहे. घाटावरील चढण मोठे असून ते कमी होण्याची आवश्यकता आहे. सोबतच घाटाच्या माथ्यावर असलेल्या वळणाची जागा अरुंद असल्याने वाहनांना वळण घेताना पुरेशा जागेअभावी प्रचंड सावधानता बाळगावी लागते. त्यामुळे वळणावर अनेकदा वाहने बंद पडतात.
रुंदीकरणाची परवानगी अडकली
घाटाचे चढण कमी करून रुंदीकरणाची गरज आहे. वन विभागाकडून घाटाच्या रुंदीकरणाला परवानगी मिळत नसल्याने घाटाचे काम रखडल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे म्हणणे आहे. तर बांधकाम विभागाकडून वन विभागाने सुचविलेल्या त्रुटी दूर केल्या जात नसल्याचे वन विभागाचे म्हणणे आहे. त्यामुळे दोघांच्या कात्रीत घाटाचे रुंदीकरणाचे काम रखडल्याचे दिसते.

