अनधिकृत बांधकामांवर हातोडा
संजय भोईर : सकाळ वृत्तसेवा
भिवंडी, ता. ९ (वार्ताहर) : शहरातील अनधिकृत आणि धोकादायक बांधकामांचा प्रश्न अनेक वर्षांपासून डोकेदुखी ठरला आहे. या बांधकामांमुळे शहरात घडलेल्या दुर्घटनांत आतापर्यंत शंभरहून अधिक नागरिकांनी जीव गमावला आहे. विशेषतः धामणकर नाका पटेल कम्पाउंड येथील जिलानी इमारत दुर्घटना (२१ सप्टेंबर २०२०) ही भिवंडीच्या इतिहासातील मोठी शोकांतिका ठरली, ज्यात तब्बल ३९ नागरिकांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर शहरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाईचा प्रश्न ऐरणीवर आला.
उच्च न्यायालयाने या संदर्भात ‘सुमोटो’ याचिका दाखल करत भिवंडीतील २९१ अनधिकृत इमारतींवर तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले होते. मात्र, गेल्या काही वर्षांत कारवाईचा वेग कमी झाल्याने परिस्थिती जैसे थे राहिली होती. अखेर, आयुक्त अनमोल सागर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर या प्रश्नाला प्राधान्य देत सर्व संबंधित अधिकारी आणि प्रभाग अधिकाऱ्यांच्या बैठकीत स्पष्ट कृती आराखडा आखून दिला. प्रत्येक महिन्यात किमान दोन अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
त्यामुळेच, मागील काही महिन्यांत पावसाळ्यातील अडचणी असूनही महानगरपालिकेने आतापर्यंत ४२ अनधिकृत बांधकामे निष्कासित केली आहेत, तर १०० बांधकामधारकांवर पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
भिवंडी महापालिकेच्या या कारवाईमुळे शहरातील अनधिकृत बांधकामांविरोधात नवीन शिस्त आणि जबाबदारीची भावना निर्माण होत आहे. मात्र, या मोहिमेचा परिणाम दीर्घकालीन व्हावा, यासाठी सातत्यपूर्ण आणि निष्पक्ष कारवाई होणे गरजेचे आहे.
सुरक्षेचे नियम धाब्यावर
भिवंडीतील अनधिकृत आणि निकृष्ट दर्जाच्या इमारती ही नवीन बाब नाही. जवळपास प्रत्येक वर्षी मोठ्या प्रमाणावर इमारत दुर्घटना घडत आहे. काही काळ चर्चा होते, त्यानंतर कारवाईची गती मंदावते. परिणामी, अशा इमारतींच्या दुर्घटनांचे चक्र थांबत नाही. भिवंडी ही यंत्रमाग उद्योगाची नगरी असल्याने येथे देशभरातून अनेक कामगार रोजगाराच्या शोधात येतात. या कामगारांना कमी दरात राहण्यासाठी घरांची सोय व्हावी, यासाठी अनेक बांधकाम व्यावसायिकांनी बिनअनुदानित, दर्जाहीन आणि धोकादायक इमारती उभारल्या. अनेकदा या बांधकामांमध्ये सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवले जातात, ज्यामुळे दुर्घटनांची शक्यता वाढते.
कारवाईतील अडथळे
अनधिकृत बांधकाम निष्कासित करताना तेथे राहणाऱ्या कुटुंबांना सुरक्षितरीत्या बाहेर काढणे हे पालिकेसमोर मोठे आव्हान ठरते. अशा कारवाईदरम्यान पोलिस बंदोबस्त आवश्यक असतो; मात्र काहीवेळा तो वेळेवर उपलब्ध न झाल्याने कारवाईला विलंब होतो. तरीदेखील, आयुक्त अनमोल सागर यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे कारवाईचा वेग लक्षणीयरीत्या वाढला आहे.
प्रभागनिहाय कारवाईचा आढावा (२०२२–२०२५)
प्रभाग अनधिकृत इमारती गुन्हे दाखल निष्कासित इमारती
क्र. १ ३५ ३४ ५
क्र. २ ६६ ११ ९
क्र. ३ ९० ३४ २१
क्र. ४ ६१ १७ २
क्र. ५ ३९ ४ ५
एकूण २९१ १०० ४२
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

