विशेष बातमी : गणेशोस्तव,दिवाळी आटोपली मात्र रो-रो बोट सुरु होण्यात अडथळे कायम

विशेष बातमी : गणेशोस्तव,दिवाळी आटोपली मात्र रो-रो बोट सुरु होण्यात अडथळे कायम

Published on

तिकीटदर अन् इंधनखर्चाचा ताळमेळ बसेना!
रो-रो सेवेसाठी प्रवाशांना आता नववर्षापर्यंत प्रतीक्षा
नितीन बिनेकर ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ :  कोकणवासीयांसाठी महत्त्वाची असलेली रो-रो फेरी सेवा पुन्हा एकदा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली गेली आहे. एका फेरीसाठी तब्बल १८ ते २० हजार लिटर डिझेल लागणार असून, त्यासाठी जवळपास २० लाख रुपयांचा खर्च येणार आहे. त्यामुळे तिकीटदर आणि इंधनखर्चाचा ताळमेळ बसत नसल्याने बोट ऑपरेटर कंपनीने सल्लागार नेमला आहे. सर्व आर्थिक बाबींचा अभ्यास करून पुढील वर्षी बोट सुरू करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती सागरी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी गणेशोत्सवादरम्यान पत्रकार परिषद घेऊन हवामान सुधारताच रो-रो बोट सुरू होईल, असे आश्वासन दिले होते. केंद्र आणि राज्य सरकारच्या सर्व परवानग्या मिळाल्याचाही दावा त्यांनी केला होता. तिकीटदरापासून प्रवासाच्या वेळापत्रकापर्यंत सर्व तपशील जाहीर केले होते; परंतु गणेशोत्सव, दसरा-दिवाळी आटोपली, तरी रो-रो सेवा अद्याप सुरू न झाल्याने  राणे यांनी या विषयावर मात्र अद्याप भाष्य केलेले नाही.

६०० प्रवासी मिळणार का?
सुमारे ६०० प्रवासी क्षमतेच्या या बोटीला इतके नियमित प्रवासी मिळतील का, हा मोठा प्रश्न आहे. सध्याच्या तिकीटदरांनुसार (२,५०० ते ९,०००) प्रवास महागडा ठरणार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर प्रवासी मिळणे अवघड आहे. त्यातच दर फेरीला लाखो रुपयांचा इंधनखर्च असल्याने प्रकल्प आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य राहील का, हा प्रश्न कायम आहे.

सरकारकडून सवलतीचा विचार
रो-रो सेवा सुरू करण्यासाठी राज्य सरकार आर्थिक सवलती देण्याचा विचार करत आहे, मात्र सध्या सल्लागारांचा अहवाल येईपर्यंत ही बोट सुरू होणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे रो-रो सेवेसाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना आता नववर्षापर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.
----
हवामानावर अवलंबून
रो-रो सेवा मुंबईहून थेट जयगड आणि विजयदुर्गपर्यंत खुल्या समुद्राच्या मार्गाने धावणार आहे. प्रवासादरम्यान समुद्र खवळलेला असल्यास बोट काळजीपूर्वक चालवावी लागते, तसेच प्रवाशांना त्याचा त्रास होऊ शकतो. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, प्रत्येक फेरीची वेळ निश्चित केली जाणार आहे. त्यामुळे ही सेवा नियमितपणे नव्हे, तर समुद्रस्थितीनुसार चालवावी लागणार असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
----
मुंबई-गोवा महामार्ग अपूर्ण असल्याने, त्याचे अपयश लपवण्यासाठी सरकारने रो-रो बोटीचे प्रलोभन दाखवले. आता गणेशोत्सव, दसरा-दिवाळी आटोपली, तरी बोट पाण्यात उतरलीच नाही. ही केवळ जनतेची फसवणूक नाही, तर कोकणवासीयांच्या भावनांशी केलेला खेळ आहे.
- रुपेश रामचंद्र दर्गे, सचिव, मुंबई-गोवा महामार्ग जनआक्रोश समिती
---
मुंबईतून कोकणात ये-जा करण्यासाठी रो-रो बोट सेवा उपलब्ध झाल्यास आनंदच आहे. तिकीटदर सामान्य जनतेला परवडणारे असल्यास दिलासा मिळेल. तसेच इतर पर्यायांवर लक्ष देण्याऐवजी मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण व कोकण रेल्वेचे दुपदरीकरण युद्धपातळीवर पूर्ण करावीत.
- अक्षय महापदी, सदस्य, कोकण विकास समिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com