डोंबिवलीत आयाराम गयाराम
डोंबिवलीत आयाराम गयाराम
राजू पाटलांनी भाजप शिवसेनेला घेरले
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १० : सध्या सुरू असलेल्या पक्षांतर, सत्ता समीकरणांच्या हालचालींवर मनसेचे आमदार राजू पाटील यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. कल्याण-डोंबिवलीतील बिकट परिस्थिती, पक्षप्रवेश, विकासकामांची गुणवत्ता आणि भ्रष्टाचार यावर थेट नामोल्लेख न करता त्यांनी भाजप आणि शिंदे गटाला लक्ष्य केले. “हे एकाच थाळीचे चट्टेबट्टे आहेत. भांडतोय असे दाखवतात, पण एकाच थाळीतून खातात,” असा घणाघात करत त्यांनी सध्याच्या राजकारणातील स्वार्थी संगनमतावर बोट ठेवले.
नुकत्याच झालेल्या एका महत्त्वाच्या पक्षप्रवेशावर प्रतिक्रिया देताना राजू पाटील म्हणाले की, हा धक्का ठाकरे गटाला नाही, तर शिंदे गटाला बसला आहे. मी हे सहा महिन्यांपूर्वी सांगितले होते, असे वक्तव्य करून त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या डावपेचांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पाटील म्हणाले की, प्रत्येक निवडणुकीत हेच नाटक सुरू असते. लोकसभा आणि विधानसभा तिकीट मागत भांडणे, आरोप-प्रत्यारोप आणि नंतर पुन्हा एकत्र येणे हा ठरलेला कार्यक्रम आहे. “भांडण हे सगळं लोकांच्या नजरा फिरवण्यासाठी. भ्रष्टाचार झाकण्यासाठी हे नाटक होतं आणि पुन्हा होत राहील” असे त्यांनी म्हटले. नागरिकांना उद्देशून ते म्हणाले, “आता मतदारांनी तरी विचार करायला हवा. त्यांना पैसा आणि पद याचे प्रलोभन दाखवून झालेले स्वार्थी राजकारण हवे की प्रत्यक्ष प्रशासन करणारा सारथी हवा? अशी टीका केली.
नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दी. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीवरूनही त्यांनी सत्ताधाऱ्यांना चिमटा काढला. “यादीत नाव घुसवायची वेळ आली की आगरी समाज आठवतो. २७ गावे बाहेर काढणार म्हणालात, आम्ही पाठीशी उभे राहिलो, भाजपचे उमेदवार निवडून दिले, पण त्यानंतर काय केलं,” असा थेट सवाल पाटील यांनी विचारला.
भाजपच्या अलीकडील उमेदवारीच्या घडामोडींवरून त्यांनी संघालाही सूचक संदेश दिला. “संघाला हे चालत नसेल. यादीत नाव काढून बघा, कोणकोण येतेय ते दिसेल,” असा टोमणा पाटील यांनी मारला. कल्याण–डोंबिवलीतील विकासकामांवरून त्यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर नाव न घेता जोरदार टीका केली. “कल्याण शिळ रोडवरील मेट्रो तरंगतीच राहणार आहे. पैसे काढून झाले आहेत. पलवा पूल, एलिव्हेटेड रोड ही कामे विकासासाठी नाहीत, फक्त टक्केवारीसाठी आहेत, असा आरोप त्यांनी केला. ते पुढे म्हणाले, “भस्मासुर नाही, यांना भस्म्या रोग झालेला आहे. शहर ओरबाडून खात आहेत.”
पलावा पुलाची गुणवत्ता तपासा
शहरातील पायाभूत सुविधांची अवस्था पाहून हे भ्रष्टाचाराचे नकाशे उभे राहात असल्याचा आरोप करत ते म्हणाले, “पलावा पुलाची गुणवत्ता बघा, हे काम नाही, फक्त ओरबाडणं आहे. मनसेला कल्याण-डोंबिवलीत लोकांनी भरभरून प्रेम दिल्याचा उल्लेख करत पाटील म्हणाले, “आम्ही तत्त्वांनी चालणारी माणसं आहोत. लोक आता सुज्ञ होत आहेत. यापुढे निर्णय लोक घेतील. राजू पाटील यांच्या या भाष्यामुळे डोंबिवली-कल्याणच्या राजकीय वातावरणात तापमान चढले असून, आगामी महापालिका निवडणुकीत या वक्तव्यांचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

