लांबलचक पूल डोकेदुखी

लांबलचक पूल डोकेदुखी

Published on

पालघर, ता. १० : पालघर रेल्वेस्थानकावर डहाणू आणि विरार बाजूकडे बांधलेले लांबलचक पादचारी उड्डाणपूल प्रवाशांसह पूर्व-पश्चिमेला ये-जा करणाऱ्या नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. उड्डाणपुलांची चढती बाजू लांबलचक असल्याने पूल चढण्यासाठी नागरिक, ज्येष्ठ नागरिक, महिला, रुग्ण, विद्यार्थ्यांना कसरत करावी लागत असल्याने संताप व्यक्त होत आहे.

पालघर पश्चिमेकडून पूर्वेकडे जाण्यासाठी डहाणू बाजूने पादचारी पूल तयार करण्यात आला आहे. रेल्वे पुलाला जोडून हा पूल गांधीनगर पूर्व भागात खाली उतरतो. तसेच विरार बाजूकडेही रेल्वेस्थानकावर उतरण्यासाठी पूर्वेकडून पश्चिमेकडे जोडणारा पादचारी उड्डाणपूल आहे. हे दोन्ही उड्डाणपूल जागेअभावी लांबलचक तयार केले आहेत. केवळ ६० ते ७० फुटांच्या जागेमध्ये चढण्यासाठी दोन झेड आकाराचे वळण असलेल्या या पुलांना शिड्या नसून थेट गुळगुळीत लाद्या आहेत. त्यामुळे दोन्हीही पूल चढण्यासाठी खूप त्रासदायक आहेत. हे पूल चढून उतरण्यासाठी नागरिक, प्रवासीवर्गाची चांगलीच दमछाक होते.

पूल चढण्यासाठी लोखंडी रेलिंग पकडून जोर लावून चढावे लागते. उतरतानाही रेलिंग पकडून सांभाळून उतरावे लागते. विद्यार्थीवर्गाला तर दप्तराच्या ओझ्यासह चढणे कठीण होते. ज्येष्ठ नागरिक या पुलावरून थांबून-थांबून चढत आहेत. जागेअभावी या पुलाची बांधणी आणि रचना केली तरी ती सदोष आहे. त्याचा फटका सर्वासामान्य नागरिक आणि प्रवाशांना सहन करावा लागतो.

पालघर पूर्वेकडील भागामध्ये रेल्वे तिकीट खिडकी नसल्यामुळे प्रवासीवर्गाला पूल चढून पश्चिमेकडे यावे लागते. तिकीट काढल्यानंतर पुन्हा गाडी पकडण्यासाठी पूल चढून दोन क्रमांकाच्या फलाटावर यावे लागते. त्यामुळे प्रवासीवर्गाची चांगलीच दमछाक होते. अनेकवेळा गाडी चुकल्याच्या घटनाही घडल्या आहेत. या असुविधेमुळे नागरिक हैराण असून, दिव्यांगांनाही हा पूल त्रासदायक ठरत आहे. त्यामुळे ताबडतोब पर्याय सुविधांची मागणी केली जात आहे.

उद्‍वाहनाची मागणी
गांधीनगर परिसरातून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी ये-जा करतात. त्यांना हा पूल त्रासदायक बनला आहे. पश्चिमेकडील फलाटावर दोन उद्‍वाहन आहेत, मात्र त्याचा वापर केवळ प्रवासी करतात. इतरांना त्याचा वापर करायचा झाल्यास फलाट तिकीट काढून जावे लागते. त्यामुळे स्थानकाच्या बाहेर पूर्व व पश्चिम बाजूकडे उद्‍वाहन उभारण्याची मागणी केली जात आहे.

बोईसरमध्ये पुलाचे विस्तारीकरण
बोईसर येथे असा पूल यापूर्वी बांधण्यात आला होता. येथे मोठी औद्योगिक वसाहत असल्याने दररोज हजारो प्रवासी येथून प्रवास करतात. त्यांना हा पूल चढ-उतार करण्यासाठी त्रासदायक ठरल्याने प्रवासीवर्गाने रेल्वेला निवेदन दिले होते. त्यानंतर प्रशासनाने विस्तारित पूल तयार करून तो रिक्षा थांब्याजवळ उतरवला. त्याच्यामुळे नागरिकांना सोयीचे गेले.

सफाळे स्थानकातही हाल
सफाळे रेल्वेस्थानकाच्या पूर्वेला असा झिक्झॅक पूल बांधण्यात आला असून, नागरिकांना सद्यःस्थितीत तो त्रासदायक ठरत आहे. त्यातच सफाळे रेल्वे फाटक बंद आहे. या पुलावरून रेल्वेस्थानकावर यायचे झाल्यास सफाळे बाजारातून या पुलावर व नंतर फलाटावर चढावे लागते.

रेल्वे पादचारी पूल चालून जाण्यासाठी खूपच त्रासदायक होतो. तिकीट काढण्यासाठी पूल चढून उतरून पुन्हा चढून दोन क्रमांकाच्या फलाटावर यावे लागते. तोवर रेल्वे सुटून जाते. पूर्वेकडे लिफ्ट, तिकीट खिडकीची सोय करावी.
- भाऊराव तायडे, रेल्वे प्रवासी, पालघर पूर्व

नागरिक, रेल्वे प्रवाशांना भेडसावणाऱ्या समस्या व त्यांचा त्रास लक्षात घेऊन लवकरच पालघर रेल्वेस्थानकाची पाहणी करण्यात येणार आहे. त्या दृष्टीने समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करेन.
- डॉ. हेमंत सवरा, खासदार, पालघर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com