टाळी एका हाताने वाजत नाही

टाळी एका हाताने वाजत नाही

Published on

टाळी एका हाताने वाजत नाही!
खासदार श्रीकांत शिंदे यांची भाजपवर टीका; बदलापुरात महायुतीत मतभेद
बदलापूर, ता. १२ (बातमीदार) : बदलापूर आणि अंबरनाथ नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये निर्माण झालेल्या मतभेदांमुळे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी भाजपला अप्रत्यक्षपणे लक्ष्य केले आहे. महायुतीबाबत बोलताना डॉ. शिंदे यांनी ‘टाळी एका हाताने वाजत नाही’ असे विधान करत, युतीसाठी दोन्ही बाजूंकडून इच्छाशक्ती असणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले.

महायुतीसाठी आपण आग्रही असून, वरिष्ठ पातळीवर अजूनही चर्चा सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यांनी शिवसेना (शिंदे गट) पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना वाद विसरून एकत्र येण्याचे आणि एकमेकांवर टीका करण्यापेक्षा कामातून उत्तर देण्याचे आवाहन केले. बदलापूर (पश्चिम) येथील गौरी हॉलमध्ये झालेल्या शिवसेना (शिंदे गट) पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात डॉ. शिंदे बोलत होते.

विकासाचं राजकारण करत असल्याने ३ डिसेंबरला होणाऱ्या बदलापूर पालिकेच्या निकालात शिवसेना महायुतीचा नगराध्यक्षच निवडून येईल, असा पूर्ण विश्वास त्यांनी व्यक्त केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विकासाचे राजकारण सुरू आहे, त्यामुळे जनता आमच्यासोबत आहे, असे मत त्यांनी मांडले.

राजकीय संभ्रम
डॉ. शिंदे यांच्या या वक्तव्यामुळे शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये काही प्रमाणात संभ्रम निर्माण झाला आहे. दोन्ही पक्षांनी आधीच आपले संभाव्य नगराध्यक्ष उमेदवार जाहीर केल्यामुळे स्थानिक राजकारणात नव्या समीकरणांना चालना मिळत असल्याचे दिसून येत आहे.

मुंब्र्यातील कारवायांवर प्रश्न
दिल्लीतील बॉम्बस्फोट प्रकरणात एटीएसने मुंब्रा परिसरात केलेल्या कारवाईवर बोलताना त्यांनी, ‘‘अशा हालचाली नेहमी मुंब्र्यातच का सुरू असतात?’’ असा प्रश्न उपस्थित केला. महायुतीचे सरकार अशा सर्व कटांना छेद देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

७०० कोटींची विकासकामे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नातून बदलापुरात सुमारे सातशे कोटींची विकासकामे झाली असून, महायुती सरकारने दिलेल्या निधीमुळे शहराचे चित्र बदलणार आहे, असे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com