रोजचे तीन तास कोंडीत
रोजचे तीन तास कोंडीत
गायमुख घाटामुळे नोकरदारवर्गाला भुर्दंड
ठाणे शहर, ता. १३ (बातमीदार) : गायमुख घाटातील खड्डेमय रस्ते आणि बंद पडणारी अवजड वाहने घोडबंदरकरांसाठी रोजची डोकेदुखी ठरत आहेत. यामुळे येथे रोजच सकाळी प्रचंड वाहतूक कोंडी होत असल्याने नोकरदारवर्गाला कामावर जायला उशीर होतो. सकाळी ६ वाजता अवजड वाहनांना वाहतुकीला परवानगी नसतानाही खड्ड्यांमुळे झालेली रात्रीची कोंडी सुटण्यासाठी तीन ते चार तासांचा अवधी लागतो. त्यामुळे सकाळी कामावर निघालेल्या चाकरमान्यांना रोजच कोंडीचा सामना करावा लागतो. परिणामी रोज लेटमार्कचासुद्धा सामना करावा लागतो, तर खड्ड्यांमुळे ठाण्यातून बाहेर पडण्यास उशीर होत असल्याने अवजड वाहनचालकांना वाहतूक विभागाच्या दंडाचा सामना करावा लागतो.
गुजरात, पालघर आणि उरण येथील जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टमधील दळणवळणासाठी गायमुख घाट महत्त्वाचा मार्ग आहे; मात्र हा घाट कधीच खड्डेमुक्त झालेला पाहायला मिळत नाही. घाटाच्या चढणीवरील खड्ड्यांमुळे घाट चढणाऱ्या वाहनांचा वेग प्रचंड प्रमाणात मंदावतो. रात्रीच्या वेळी घाटावर जड-अवजड वाहनांची लागलेली रांग प्रचंड धिम्यागतीने पुढे सरकत असते. त्यामुळे घोडबंदर मार्गाने भाईंदरकडे जाणारी वाहिनी कासारवडवली, माजिवड्यापर्यंत कोंडीमध्ये अडकते. गुरुवारीही (ता. १३) भल्या सकाळी अशीच कोंडी झाली. गायमुख घाटावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहतूक धीम्या गतीने सुरू असतानाच भाईंदर येथून येणाऱ्या वाहिनीवर काजूपाडा भागात भलामोठा कंटेनर घेऊन जाणारे वाहन रस्त्याच्या दुभाजकावर चढल्याने बंद पडले. बंद पडलेल्या कंटेनरमुळे सकाळची वाहतूक कोंडी आणखी वाढली. रात्री रस्त्यावर वाहतूक करत असलेली वाहने भाईंदर आणि ठाण्याच्या हद्दीमधून बाहेर पडण्यास विलंब झाला. त्याचा फटका सकाळी कामावर जाण्यासाठी निघालेल्या चाकरमान्यांना बसला. त्यांना वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागले. बोरिवली, दहिसर, मिरा-भाईंदर, पालघर, वसई आदी ठिकाणी जाणाऱ्या कामगारवर्गाला जादा फटका बसला.
गुणवत्तेबद्दल प्रश्नचिन्ह
गायमुख घाटाची दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे. या विभागाकडून अनेकदा घाटाची दुरुस्ती करण्यात आली आहे. पावसाळ्यात दोन वेळा मास्टिंग केले आहे. अनेकदा खड्डे भरले आहेत; मात्र तरीही काही दिवसांतच केलेल्या कामाची दुरवस्था होते. त्यामुळे विभागाकडून केल्या जाणाऱ्या कामाच्या गुणवत्तेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत.
वाहतूक विभागाला मनस्ताप
गायमुख घाट मिरा-भाईंदर वाहतूक पोलिसांच्या अधिकार क्षेत्रात येत आहे; मात्र घाटावरील खड्ड्यांमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीचा फटका ठाणे वाहतूक विभागाला बसत आहे. घाटावर बंद पडलेली वाहने बाजूला करण्यासाठी ठाणे वाहतूक पोलिसांना क्रेनची व्यवस्था करावी लागते.
रोजच लेट मार्क
चाकरमान्यांना सकाळी ९ वाजता कामावर हजर होण्यासाठी सकाळी ७ वाजता घरातून बाहेर पडावे लागते; मात्र तरीही घाटातील खड्ड्यांमुळे झालेल्या वाहतूक कोंडीतून बाहेर पडून कामावर हजर होईपर्यंत अनेकदा लेट मार्कचा सामना करावा लागतो.

