जलद रुग्णसेवेसाठी पालिका भाड्याने घेणार रुग्णवाहिका
जलद रुग्णसेवेसाठी पालिका भाड्याने घेणार रुग्णवाहिका
१५-२० मिनिटांत सेवा पुरविण्याचा आरोग्य विभागाचा दावा
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १९ : शहरातील वाढत्या लोकसंख्येमुळे रुग्णवाहिकांची कमतरता जाणवू लागली आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने कोरोनाकाळातील धर्तीवर पुन्हा एकदा रुग्णवाहिका भाडेतत्त्वावर घेण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत १५ ते २० मिनिटांत रुग्णवाहिका उपलब्ध होईल, असा दावा महापालिकेकडून करण्यात आला आहे.
कळवा परिसरात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयासोबतच शहरात ३३ आरोग्य केंद्रे व ६ प्रसूतिगृहे कार्यरत आहेत. प्रसूतिगृहांमध्ये दाखल झालेल्या महिलांना काही वेळा तातडीच्या उपचारांसाठी कळवा रुग्णालयात न्यावे लागते. तसेच गंभीर रुग्णांना ठाण्यातून मुंबई व उपनगरातील शासकीय रुग्णालयातही पाठवले जाते. सध्या पालिकेकडे सहा साध्या आणि पाच कार्डियाक अशा एकूण ११ रुग्णवाहिका आहेत; मात्र या गाड्या १२ ते १५ वर्षे जुन्या असल्याने वारंवार नादुरुस्त होणे किंवा बंद पडणे हे प्रकार घडत आहेत.
१५ वर्षांहून जुनी रुग्णवाहिका शहराबाहेर नेण्यास परिवहन विभागाची परवानगी नसल्याने अडचणी वाढल्या आहेत. २६ लाखांवर गेलेल्या लोकसंख्येच्या तुलनेत उपलब्ध रुग्णवाहिका अपुऱ्या असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर, आयुक्त सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. प्रसाद पाटील यांनी खासगी रुग्णवाहिका भाडेतत्त्वावर घेण्याचा प्रस्ताव मांडला. प्रशासकीय सभेने या प्रस्तावाला अंतिम मंजुरी दिली असून, महापालिकेला दरवर्षी तीन कोटी ८० लाख ९९ हजार ६५८ रुपये एवढा खर्च अपेक्षित आहे.
भाडेतत्त्वाचा पर्याय अधिक किफायतशीर
एका रुग्णवाहिकेची खरेदी, नोंदणी, विमा, देखभाल, इंधन आणि चार चालकांची नेमणूक या सर्वांवर एकूण ८० ते ८५ लाख रुपयांपर्यंत खर्च येतो. त्याउलट खासगी रुग्णवाहिकेच्या एका फेरीचा खर्च ५५०० ते ७५०० रुपये येत असल्याने भाडेतत्त्व अधिक आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरेल, असा महापालिकेचा अंदाज आहे.
२४ तास सेवा
रुग्णवाहिकांसाठी २४ तास हेल्पलाइन उपलब्ध असेल. तातडीच्या परिस्थितीत अतिमहत्त्वाच्या रुग्णांसाठी त्वरित सेवा दिली जाईल. तसेच रुग्णवाहिकांचे रिअल-टाइम ट्रॅकिंगही शक्य होणार आहे. ठाणे शहरात सर्वांसाठी एकसमान दर ठेवला जाईल आणि कॉल मिळाल्यानंतर १५-२० मिनिटांच्या आत रुग्णवाहिका पोहोचवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, अशी माहिती डॉ. प्रसाद पाटील यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

