

स्वच्छता मोहिमेत एसटीस्थानकांची पाहणी
कल्याण, डोंबिवली आणि विठ्ठलवाडी आगारांचा सर्वांगीण आढावा
कल्याण, ता. २० (बातमीदार) : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियानांतर्गत कल्याण आणि डोंबिवली एसटी आगाराचे मूल्यांकन पालघर विभागातून आलेल्या सर्वेक्षण समितीने गुरुवारी (ता. २०) केले. कल्याण व डोंबिवली स्थानक, तर विठ्ठलवाडी आगाराअंतर्गत विठ्ठलवाडी व बदलापूर स्थानकांची तपासणी करण्यात आली.
या पाहणीदरम्यान समितीने आगारातील स्वच्छता, प्रवासी आसने, घड्याळे, वेळापत्रक फलक, प्रवासी चौकशी खिडक्या, कर्मचारी निवासगृह, उपहारगृह आणि शौचालयांची स्थिती यांचा आढावा घेतला. प्रवासी व पत्रकारांच्या उपस्थितीत समितीने हे सर्वेक्षण पूर्ण करून बसस्थानकांचे गुणांकन नोंदवले. महाराष्ट्रातील प्रत्येक एसटी स्थानकात दर तीन महिन्यांनी असे सर्वेक्षण घेतले जाते. चार सर्वेक्षणांनंतर सरासरीच्या आधारे राज्यातील सर्वोत्कृष्ट आगार निश्चित केला जातो. पाहणीदरम्यान समितीने दोन्ही आगारांतील स्वच्छतेची स्थिती तपासून काही त्रुटी निदर्शनास आणल्या असून, त्या सुधारण्यासाठी संबंधित आगारप्रमुखांना सूचनाही दिल्या आहेत.
कल्याण आगाराचे नूतनीकरण होत असल्याने या अभियानात चांगले मूल्यांकन मिळणे जिकिरीचे बनले आहे. याउलट विठ्ठलवाडी आगारातही अनेक समस्या असून, नूतनीकरण होणे आवश्यक आहे. या वेळी कल्याण आगार व्यवस्थापक महेश भोये, विठ्ठलवाडी आगार व्यवस्थापक नवज्योत गावडे उपस्थित होते, तर पालघर विभाग नियंत्रक कैलास पाटील, विभागीय कर्मचारीवर्ग अधिकारी विजय पवार व प्रवाशांनी सर्वेक्षणाचे मूल्यांकन केले.
तीन कोटी रुपयांचे बक्षीस
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियानअंतर्गत राज्यभरातील सर्व एसटी बसस्थानकांवर वर्षभर राबवले जाणारे एक स्वच्छता व सौंदर्यीकरण अभियान आहे. या अभियानाचा मुख्य उद्देश प्रवाशांना स्वच्छ, सुंदर बसस्थानक आणि प्रसाधनगृहे उपलब्ध करून देणे हा आहे. सर्वेक्षणातील गुणांच्या आधारावर राज्यातील सर्वांत उत्कृष्ट एसटी बसस्थानक ठरवले जाते. यासाठी राज्यभरात तीन कोटी रुपयांच्या बक्षीस वाटपाचे नियोजन असून, अ वर्गातील प्रथम क्रमांकावर येणाऱ्या बसस्थानकाला एक कोटी रुपयांचे बक्षीस मिळते. राज्यभरातील एसटी बसस्थानकांचा कायापालट करणे आणि त्यांच्या दर्जात सुधारणा करणे हाच या अभियानात मागचा प्रमुख हेतू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.