मिरा भाईंदरच्या मेट्रोला डिसेंबरचा मुहूर्त

मिरा भाईंदरच्या मेट्रोला डिसेंबरचा मुहूर्त

Published on

मिरा-भाईंदरच्या मेट्रोला डिसेंबरचा मुहूर्त
परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून मेट्रो मार्गाची पाहणी

भाईंदर, ता. २० (बातमीदार) : दहिसरहून मिरा-भाईंदरच्या हद्दीत येणाऱ्या मेट्रोचा दहिसर ते काशी मिरा हा पहिला टप्पा डिसेंबरअखेर सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या मार्गाच्या सुरक्षेच्या दृष्टीने सुरू असलेल्या चाचण्या आता अंतिम टप्प्यात आहेत. डिसेंबरअखेर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते पहिल्या टप्प्याचे लोकार्पण होणार आहे. परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी या मार्गाची गुरुवारी (ता. २०) पाहणी केली.
दहिसरपर्यंत आलेली मेट्रो भाईंदर पश्चिम येथील नेताजी सुभाषचंद्र बोस मैदानापर्यंत येणार आहे. या मार्गावरील दहिसर ते काशी मिरा या पहिल्या टप्प्याचे काम आता अंतिम टप्प्यात आहे. यावर्षी मे महिन्यात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी मेट्रोच्या कामाची पाहणी केली होती. त्याचवेळी पहिला टप्पा डिसेंबर महिन्यात सुरू करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. सध्या मार्गावर सुरक्षेच्या दृष्टीने चाचण्या सुरू आहेत. या चाचण्या डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पूर्ण होणार आहेत. त्यानंतर काही दिवसांतच मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांचे (सीएमआरएस) प्रमाणपत्र मिळणार आहे. हे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर मेट्रो मार्ग सुरू करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. त्यामुळे डिसेंबरअखेर या मार्गावर मेट्रो धावण्याची शक्यता आहे. दहिसर ते काशी मिरा हा पहिला टप्पा ४.५ किमी लांबीचा असून, त्यात मुंबईच्या हद्दीतील दहिसर पूर्व व मिरा-भाईंदरच्या हद्दीतील पांडुरंग वाडी, मिरा गाव व काशीगाव अशी चार स्थानके आहेत.
----
वसई-विरारहून थेट कुलाबा
हा मार्ग सुरू झाल्यानंतर मिरा-भाईंदरचे प्रवासी मेट्रोने अंधेरीपर्यंत जाऊ शकतील. तसेच अंधेरी येथून मेट्रो १ चा वापर करून विमानतळ स्थानक ३ मधून थेट कुलाबापर्यंतदेखील जाऊ शकणार आहेत. त्यामुळे नवीन वर्षात मिरा-भाईंदरवासीयांसाठी छत्रपती शिवाजी महाराज रेल्वेस्थानक दक्षिण मुंबईतील मंत्रालय, विधान भवन येथे मेट्रोने जाता येणार आहे. मेट्रोचा दुसरा टप्पा काशी मिरा ते नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान पुढील वर्षी म्हणजे डिसेंबर २०२६ पर्यंत सुरू होणार आहे. त्यासोबतच वसई-विरार मेट्रो मार्गाचे कामदेखील लवकरच सुरू होणार आहे. त्यामुळे वसई-विरारहून थेट कुलाबा असे मेट्रोचे जाळे आगामी काळात विस्तारणार आहे. मेट्रोच्या पहिल्या टप्प्याच्या मार्गाची गुरुवारी परिवनहमंत्री प्रताप सरनाईक यांनी पाहणी केली. त्यांच्या सोबत महामेट्रोचे अधीक्षक अभियंता, तंत्रज्ञ, सल्लागार व कंत्राटदार आदी उपस्थित होते.
---
कोट
मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांचे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर दहिसर ते काशी मिरा या नव्या मेट्रो मार्गाचे डिसेंबरअखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण करण्याचे नियोजन केले जाईल.
-प्रताप सरनाईक, परिवहनमंत्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com