ऑनलाईन ड्रेस खरेदीची हौस १४ लाखांना
ऑनलाइन खरेदी पडली १४ लाखांना
ओटीपी, स्क्रीन शेअर केल्याने फसवणूक
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २२ ः एखादी चूक किती महागात पडू शकते, याचे उदाहरण चितळसर पोलिस ठाण्यातील एका घटनेतून समोर आले आहे. ठाण्यातील एका उच्चभ्रू वस्तीत राहणाऱ्या ५१ वर्षीय व्यक्तीच्या १७ वर्षीय मुलीने ऑनलाइन ड्रेस ऑर्डर केला; मात्र डिलिव्हरी न मिळाल्याने तिने केलेल्या एका चुकीमुळे वडिलांना तब्बल १३ लाख ८० हजार ३२० रुपयांना गंडा बसला असून, तो ड्रेसही डिलिव्हरी झालेला नाही.
तक्रारदार वडिलांच्या मोबाईलवरून १७ वर्षीय मुलीने हौसेने ऑनलाइन ड्रेस खरेदी केला होता. ड्रेसची डिलिव्हरी येत नसल्यामुळे तिने गुगलवरून संपर्क क्रमांक शोधून ड्रेसबाबत विचारणा केली. त्या वेळी ऑर्डरची डिलिव्हरी हँडल करणाऱ्या अजय नामक व्यक्तीने तिला व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉल केला. या व्यक्तीने मुलीकडे फोनवर आलेला ओटीपी मागितला आणि स्क्रीन शेअर करण्यास सांगितले. ड्रेसच्या नादात मुलीने कोणताही विचार न करता ओटीपी आणि स्क्रीन शेअर केली. त्यानंतरही ड्रेसची डिलिव्हरी झाली नाही.
क्रेडिट कार्ड लिमिट वाढवून गंडा
१२ ऑक्टोबरला सायंकाळी ५.१५च्या सुमारास मुलीने वडिलांना ही सर्व माहिती सांगितली. त्या वेळी वडिलांनी मोबाईल तपासला असता, त्यांच्या क्रेडिट कार्डची लिमिट दीड लाख असताना ती १५ लाख इतकी वाढलेली दिसली. त्यांनी मॅसेज तपासले असता, ‘अमेझॉन पे बंगलोर’ येथे चार व्यवहार झाल्याचे दिसून आले. या चार वस्तू खरेदीतून त्यांची १३ लाख ८० हजार ३२० रुपयांची ऑनलाइन आर्थिक फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात येताच, त्यांनी तत्काळ १९३० या सायबर हेल्पलाइनवर तक्रार दाखल केली. याप्रकरणी गुरुवारी (ता. २०) चितळसर पोलिस ठाण्यात अजय नामक डिलिव्हरी हॅन्डल करणाऱ्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलिस करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

