‘इन दि सर्च ऑफ…’ नाटकाचा यशस्वी प्रयोग
‘इन द सर्च ऑफ’ नाटकाचा यशस्वी प्रयोग
कल्याणच्या आचार्य अत्रे रंगमंदिरात राज्यस्तरीय हौशी स्पर्धेला प्रतिसाद
मुरबाड, ता. २२ (वार्ताहर) : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे दरवर्षी आयोजित करण्यात येणारी ६४वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धा सध्या कल्याण केंद्रात उत्साहात सुरू आहे. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत मुरबाड येथील सुप्रसिद्ध ‘गर्जा प्रतिष्ठान’ संस्थेने यंदाही सहभाग घेतला असून, त्यांच्या वतीने सादर करण्यात आलेल्या ‘इन द सर्च ऑफ’ या नाटकाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. लेखक व दिग्दर्शक नितेश डोंगरे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या नाटकाचा प्रयोग कल्याण येथील आचार्य अत्रे रंगमंदिरात अत्यंत उत्स्फूर्त वातावरणात पार पडला.
हे नाटक केवळ मनोरंजनावर थांबत नाही, तर ते आधुनिक समाजाला आरसा दाखवणारे आहे. माणसाने देव शोधण्यासाठी मंदिराच्या दारात जाण्याऐवजी स्वतःच्या अंतर्मनात डोकावले पाहिजे, असा खोल आशय या नाटकातून मांडण्यात आला आहे. विज्ञान व तंत्रज्ञानामुळे प्रगती करीत असताना माणूस मूल्यांपासून दूर जात आहे, ही आजच्या समाजाची गंभीर बाब या कथानकातून व्यक्त होते. काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर आणि मद इत्यादीने ग्रासलेल्या मानवी मनाला पुन्हा माणुसकीची जाणीव करून देण्याचा प्रयत्न हे नाटक करते. हरिपूर या छोट्याशा काल्पनिक गावातून उलगडणारी ही कथा विनोद, भावनात्मकता आणि वास्तवतेचा सुरेख समतोल साधते. या नाटकात तब्बल २२ कलाकारांनी ३६ विविध भूमिका साकारत आपली अभिनयक्षमता प्रभावीपणे सादर केली. धोंडू हवालदाराची भूमिका साकारणारे अजिंक्य डोंगरे, सावळ्या साकारणारे नितेश डोंगरे, रखमाच्या भूमिकेत सुप्रिया गायकवाड तसेच देवकीनंदन, विठ्ठल आणि पोलिस अधिकारी या तिहेरी भूमिकेत प्रथमेश रोठे या कलाकारांची कामगिरी विशेष लक्षवेधी ठरली. त्याचबरोबर संतोष भांडे (भडक्या), विनय गायकर (घशात्या), सानिका भोईर (भुलवा), भूषण मिरकुटे (झगमग्या), प्रदीप देसले (वासू) आणि निशांत कडू (फुशारक्या) यांनीही नाटकाला आवश्यक रंगत आणली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

