ठाण्यातील क्रिकेटच्या विकासासाठी एमसीए वचनबद्ध

ठाण्यातील क्रिकेटच्या विकासासाठी एमसीए वचनबद्ध

Published on

ठाण्यातील क्रिकेटच्या विकासासाठी एमसीए वचनबद्ध
अध्यक्ष अजिंक्य नाईक यांचे स्पोर्टिंग क्लबला आश्वासन
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २२ : ठाणे हे लवकरच देशपातळीवरील तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेटपटू घडवणारे एक महत्त्वाचे केंद्र बनेल, असा विश्वास मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए)चे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी व्यक्त केला. ठाण्यातील क्रिकेटच्या सर्वांगीण विकासासाठी स्पोर्टिंग क्लब कमिटीला लागणारी सर्वतोपरी मदत एमसीएकडून दिली जाईल, असे ठोस आश्वासन त्यांनी या वेळी दिले.
स्पोर्टिंग क्लब कमिटीच्या वतीने नव्याने उभारण्यात आलेल्या अद्ययावत ड्रेसिंग रूम आणि इनडोअर क्रिकेट अकॅडमीचे उद्घाटन तसेच १४ वर्षांखालील शताब्दी चषक क्रिकेट स्पर्धेचे पारितोषिक वितरण अजिंक्य नाईक व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले. या कार्यक्रमात बोलताना अजिंक्य नाईक यांनी गेल्या काही वर्षांत ठाणे क्रिकेटमध्ये झालेल्या घडामोडींचे विशेष कौतुक केले. स्पोर्टिंग क्लब कमिटीचे सचिव आणि एमसीए कार्यकारिणी सदस्य विकास रेपाळे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या विकासकामांचा उल्लेख करीत अजिंक्य नाईक म्हणाले, की मागील एमसीए कार्यकारिणीने अवघ्या तीन वर्षांत ३० वर्षांइतके काम पूर्ण केले आहे. त्याच धर्तीवर स्पोर्टिंग क्लब कमिटीही वेगाने प्रगती करीत असल्याचे त्यांनी नमूद केले. खेळाडू घडविण्याचे खरे काम मैदानावरच होते. त्यासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा उभ्या करणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी एमसीए सदैव स्पोर्टिंग क्लबसोबत उभे राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले. मागील काही वर्षांत ठाण्यातून अनेक दर्जेदार क्रिकेटपटू तयार होत असून, विशेषतः गेल्या सहा वर्षांत ठाणे क्रिकेटला नवी दिशा मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
..............
खेळाडूंना मार्गदर्शन
या वेळी उपस्थित तरुण खेळाडूंना मार्गदर्शन करताना अजिंक्य नाईक यांनी शिस्त, मेहनत आणि संयम या गुणांवर भर दिला. पालक आणि प्रशिक्षकांचा नेहमी आदर ठेवा. आजचे जग डिजिटल झाले असले तरी मोबाईल, प्लेस्टेशन, आयपॅड आणि सोशल मीडियाला बाजूला ठेवून अधिकाधिक वेळ मैदानावर द्या, असा मौल्यवान सल्ला त्यांनी दिला. स्पोर्टिंग क्लब कमिटी आयोजित १४ वर्षांखालील शताब्दी चषक क्रिकेट स्पर्धेत सलग तिसऱ्यांदा युनियन क्रिकेट अकॅडमी संघाने विजेतेपद पटकावले. युनायटेड क्रिकेट क्लब असोसिएशन संघ उपविजेता ठरला. विजयी व उपविजयी संघांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते चषक देऊन गौरविण्यात आले.
..................
आम्ही दिलेला शब्द पाळला
या कार्यक्रमात बोलताना स्पोर्टिंग क्लब कमिटीचे सचिव विकास रेपाळे म्हणाले, की निवडणुकीच्या वेळी एका महिन्यात अद्ययावत ड्रेसिंग रूम आणि इनडोअर क्रिकेट अकॅडमी उभारण्याचे आश्वासन आम्ही दिले होते. काहींनी त्यावर टीका केली, मात्र आज अवघ्या एका महिन्यात ते काम पूर्ण झाल्याने मनस्वी आनंद होत आहे. आम्ही दिलेला शब्द पाळला आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com