शहापूर पोलिसांचा कम्युनिटी पोलिसिंगचा नवा पॅटर्न

शहापूर पोलिसांचा कम्युनिटी पोलिसिंगचा नवा पॅटर्न

Published on

शहापूर पोलिसांचा कम्युनिटी पोलिसिंगचा नवा पॅटर्न
ग्रामीण भागात पोलिस-विद्यार्थी संवादातून उभारतोय विश्वासाचा पूल
टिटवाळा, ता. २३ (वार्ताहर) : शहापूर-ठाणे ग्रामीण पोलिस दलाने कम्युनिटी पोलिसिंगचा एक अभिनव आणि प्रभावी असा नवा पॅटर्न सुरू केला आहे. स्थानिक प्रशासन, पोलिस यंत्रणा आणि विद्यार्थी यांच्यातील नात्याला एक नवी दिशा दिली आहे. शहापूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मुकेश ढगे यांच्या पुढाकारातून होमी भाभा विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना ग्रामीण जीवनाचा आणि पोलिसिंगचा अनुभव देण्यासाठी हा विशेष शैक्षणिक उपक्रम राबवण्यात आला.
पोलिस महानिरीक्षक दराडे यांच्या संकल्पनेतून उभा राहिलेल्या समुद्र संदेश या उपक्रमाचा लाभ राज्यातील जवळपास तीन हजार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला आहे. समाजातील कायदा-सुव्यवस्था, नागरिकांचे अधिकार, सुरक्षिततेची मूलतत्त्वे आणि समाजातील गुन्हेगारीविषयी सजगता याबाबत तरुणांना योग्य माहिती देणे हा या प्रकल्पाचा मूळ हेतू आहे. त्याचा पुढचा टप्पा म्हणून शहापूर पोलिसांनी विद्यार्थ्यांना थेट ग्रामीण जीवनाशी जोडणारा अनुभव देत हा नव्या पिढीशी संवाद अधिक दृढ केला.

महिला सक्षमीकरणाची चळवळ
होमी भाभा विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी एकदिवसीय ग्रामीण अध्ययन शिबिरात शहापूर तालुक्यातील माहुली किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या आवळे गावाला भेट दिली. महिला बचत गटांसोबत संवादातून महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) कशाप्रकारे महिला सक्षमीकरणाची मजबूत चळवळ उभी करते याची विद्यार्थ्यांना माहिती दिली. जिल्हा परिषदेच्या शाळांतील शिक्षक आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ग्रामीण शिक्षणातील आव्हाने, संधी आणि वास्तविक गरजा त्यांनी जाणून घेतल्या. विद्यार्थ्यांनी गावातील शालेय मुलांसाठी अभ्यास साहित्य आणि खाऊचे वाटप करून सामाजिक बांधिलकीचे दर्शनही घडवले.

पोलिसांचे मार्गदर्शन
मुकेश ढगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना ग्रामीण भागातील कायदा-सुव्यवस्था, समुदाय पोलिसिंगची गरज, गुन्हे प्रतिबंधक उपाययोजना आणि पोलिस-जनता सहभागातून निर्माण होणारी सुरक्षितता याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. अनुभवातून शिक्षण ही काळाची तातडीची गरज आहे. विद्यार्थ्यांनी पुस्तकी ज्ञानाबरोबरच प्रत्यक्ष जीवनाशी जोडले गेले पाहिजे. या दिशेने सातत्याने प्रयत्न करीत आहोत, असे प्रा. अमेय सुनील महाजन यांनी सांगितले.

नवीन मॉडेल
शहापूर पोलिसांचा हा पुढाकार कायदा-सुव्यवस्था, जनसहभाग आणि पुढील पिढीचे संवेदनशील संस्कार या त्रिसूत्रीवर आधारित आहे. ग्रामीण भागातील समस्या, सामाजिक घडामोडी आणि पोलिस यंत्रणेचे वास्तव विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणारा हा उपक्रम राज्यातील कम्युनिटी पोलिसिंगचे नवे मॉडेल ठरू शकते, अशी व्यापक चर्चा स्थानिक पातळीवर सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com