किन्हवलीतील ग्रामीण कलावंत मुकूंद उबाळे यांना " ऊत " चित्रपटात संधी
‘ऊत’ चित्रपटातून शहापूरचे मुकुंद उबाळे चमकले
शहापूर, ता. २३ (वार्ताहर) : तालुक्यातील किन्हवली गावातील कलावंत मुकुंद उबाळे यांना त्यांच्या गावपातळीवरील आणि ग्रामीण नाट्य कलाकृतींमधील अभिनयाच्या अनुभवामुळे ‘ऊत’ या मराठी चित्रपटात अभिनयाची संधी मिळाली आहे. त्यांचा हा चित्रपट शुक्रवारी (ता. २१) संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे.
‘ऊत’ हा चित्रपट प्रेमकथेवर आधारित आहे. उच्चभ्रू युवतीच्या प्रेमात पडलेला मागासवर्गीय युवक तिला मिळवण्यासाठी कठोर मेहनत घेऊन आयपीएस अधिकारी बनतो. यानंतर त्याला त्याचे प्रेम मिळते की नाही आणि त्यांच्या प्रेमाचा शेवट काय होतो, याभोवती चित्रपटाची कथा फिरते. या चित्रपटात मुकूंद उबाळे यांनी बारमालक अण्णा शेट्टीची भूमिका साकारली आहे. यासोबतच त्यांनी लोकेशन मॅनेजर म्हणूनही या चित्रपटाचे काम पाहिले आहे.
मुकूंद उबाळे हे हौशी कलावंत असून किन्हवली गावात गावपातळीवर सादर झालेल्या मनोरंजनात्मक नाट्यकलाकृतींतून त्यांनी अनेकदा अभिनय केला. त्यांची ओळख चित्रपट निर्माता राज मिसाळ यांच्याशी झाल्यानंतर त्यांना चित्रपटात भूमिका साकारण्याची संधी मिळाली. विशेष म्हणजे उबाळे यांच्या आग्रहामुळे या चित्रपटाचे काही प्रसंग शहापूर तालुक्यातील प्रेक्षणीय स्थळांच्या ठिकाणी चित्रित करण्यात आली आहेत. याबाबत मुकूंद उबाळे म्हणाले की, अभिनय साकारण्याची हौस नेहमीच राहिली आहे. परंतु थेट चित्रपटाच्या रुपेरी पडद्यावर झळकण्याची संधी मिळाल्याने मनस्वी आनंद झाला आहे.

