पंचायत समितीला लवकरच नवीन इमारत

पंचायत समितीला लवकरच नवीन इमारत

Published on

विरार, ता. २३ (बातमीदार) : एके काळी वसईवर सत्ता गाजविली जात होती, त्या पंचायत समितीची इमारत अतिशय जीर्ण झाली आहे. ती अखेरच्या घटका मोजत गेल्या चार ते पाच वर्षांपासून उभी आहे. सरकारच्या मंजुरीनंतर पंचायत समितीची धोकादायक इमारत पाडून त्याठिकाणी नवीन इमारत उभारली जाणार आहे. त्यामुळे या इमारतीच्या पुनर्विकासाला गती मिळणार आहे.

वसईच्या तहसील कार्यालयासमोर पंचायत समिती कार्यालयाची इमारत आहे. हे कार्यालय दोन हजार ९८८ चौरस मीटर क्षेत्रात विस्तारले असून यात विविध विभागांची कार्यालये आहेत, पण इमारतीच्या भिंतींना गेलेले तडे, कमकुवत झालेले बांधकाम यामुळे पंचायत समितीची इमारत धोकादायक घोषीत करून खाली करण्यात आली होती. जुन्या इमारतीच्या ठिकाणी नवीन प्रशस्त इमारत उभारण्याची मागणी शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख प्रथमेश राऊत हे करत होते. त्यांच्या पाठपुराव्याला आता यश आले आहे. जुनी इमारत पाडून त्याठिकाणी नवीन इमारत उभारणीच्या कामाला आता वेग येणार आहे.

पंचायत समितीची इमारत धोकादायक झाल्याने या इमारतीत असलेले विविध विभाग मागील बाजूच्या कार्यालयात हलविण्यात आले आहेत, पण अपुऱ्या जागेमुळे पंचायत समितीचे सर्वच विभाग विखुलेल्या अवस्थेत आहेत. महत्त्वाची कागदपत्रे, दस्तऐवज, फाईल ठेवण्यासाठीसुद्धा जागा नसल्याने ती एका एकावर एक रचून अगदी दाटीवाटीने ठेवली जात आहेत. यामुळे मोठी अडचण निर्माण होत असून कर्मचारी आणि नागरिकांची गैरसोय होत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

लवकरच प्रक्रियेला वेग!
सरकारने दिलेल्या मंजुरीनंतर पंचायत समितीच्या धोकादायक इमारतीच्या पाडकामासाठी येत्या दोन ते तीन दिवसात निविदा प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. ही इमारत पाडल्यानंतर त्याठिकाणी नवीन इमारत उभी करण्याच्या कामासाठी पुढील प्रक्रिया राबविली जाणार आहे, असे वसई पंचायत समितीचे गटविकास अधिकारी छत्तरसिंग राजपूत यांनी सांगितले.

एके काळी या इमारतीमधून पूर्ण वसई तालुक्याचा कारभार चालत होता. आता जीर्ण झालेली इमारत पाडून त्या ठिकाणी नवीन इमारत बांधण्याची मागणी आम्ही अनेक वर्षांपासून करत होतो. त्या मागणीला आता यश आले आहे. आता प्रशासनाने ही इमारत लवकरात लवकर उभी करावी.
- प्रथमेश राऊत, तालुकाप्रमुख, शिवसेना ठाकरे गट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com