उल्हासनगरात “लोकशाही आहे, राजशाही नाही!
उल्हासनगरात लोकशाही आहे, राजेशाही नाही!
रिक्षाचालकावरील हल्ल्यावरून भाजपचा शिंदे गटावर निशाणा
उल्हासनगर, ता. २४ (वार्ताहर) ः उल्हासनगर महापालिका निवडणुकीची चाहूल लागताच येथील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. हिराघाट परिसरात भाजपमध्ये नुकत्याच दाखल झालेल्या एका रिक्षाचालक कार्यकर्त्यावर झालेल्या हल्ल्यानंतर, भाजपने थेट रस्त्यावर उतरून शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला आहे. या हल्ल्यामुळे रिक्षाचालकांच्या सन्मानावरच गदा आल्याचा सूर उमटत असून, भाजपने ‘उल्हासनगरात लोकशाही आहे, राजेशाही नाही!’ आणि ‘रिक्षावाल्यांच्या सन्मानासाठी भाजप मैदानात!’ या घणाघाती घोषणा देत परिसर दणाणून सोडला. हा मोर्चा केवळ निषेध नसून, येणाऱ्या निवडणुकीचा ‘राजकीय बिगुल’ असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
उल्हासनगर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय तणाव वाढलेला असताना, हिराघाट येथील भाजपमध्ये नव्याने दाखल झालेल्या गटातील कार्यकर्ते योगेश पवार यांच्यावर हल्ला झाला. शिंदे गटाचे नेते राजेंद्र चौधरी यांच्या समर्थकांनी हा हल्ला केला. पवार हे चौधरी यांच्याविरोधात काम करत असल्याच्या रागातून हा प्रकार घडल्याचे भाजपचे म्हणणे आहे. भाजप जिल्हाध्यक्ष राजेश वधारिया यांनी स्पष्ट केले, की शुभांगी आणि पप्पू बेहनवाल यांच्या भाजप प्रवेशानंतर त्यांच्या समर्थकांना धमक्या देण्याचे प्रकार वाढले आहेत. दडपशाहीला उत्तर देणे आम्हालादेखील चांगलेच जमते. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट पसरली असून राजकीय तणाव चांगलाच चिघळला आहे.
भाजपचा मोर्चा
हल्ल्याचा निषेध करण्यासाठी रविवारी संध्याकाळी हिराघाट परिसरात भाजप जिल्हाध्यक्ष राजेश वधारिया आणि निवडणूक समिती अध्यक्ष प्रदीप रामचंदानी यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. ‘रिक्षावाल्यांच्या सन्मानासाठी भाजप मैदानात!’ या जोरदार नाऱ्यांनी परिसर दुमदुमला. हल्लेखोरांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी करत, हा हल्ला केवळ राजकीय मतभेद नसून दहशत आणि भीती निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप मोर्चेकऱ्यांनी केला. अशा गुंडगिरीला प्रशासनाने कठोर पातळीवर आळा घालून दोषींना अटक करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
पीडित कुटुंबासोबत थेट रवींद्र चव्हाण यांचा संवाद
मोर्चा संपल्यानंतर भाजपच्या एका टीमने थेट पीडित कुटुंबाची भेट घेतली आणि योगेश पवार यांच्या सुरक्षेबाबत तसेच पुढील न्यायप्रक्रियेबाबत संपूर्ण मदतीचे आश्वासन दिले. याच दरम्यान, निवडणूक समिती अध्यक्ष प्रदीप रामचंदानी यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याशी फोनवर चर्चा केली. प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी स्वतः पीडित कुटुंबासोबत संवाद साधला आणि त्यांना आश्वासन दिले, की या प्रकरणात न्याय मिळाल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. उल्हासनगरात लोकशाही आहे, राजेशाही नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

