ठाण्यात मतदार याद्यांवरून गाेंधळ
ठाण्यात मतदार याद्यांवरून गाेंधळ
पालिका मुख्यालयात मनसेची धडक; अधिकाऱ्यांसमोर उधळली कागदपत्रे
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २४ : आगामी ठाणे महापालिका निवडणुकांसाठी प्रसिद्ध झालेल्या मतदार याद्यांत मोठ्या प्रमाणात त्रुटी असल्याचा आरोप करून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सोमवारी (ता. २४) दुपारी पालिका मुख्यालयात धडक दिली. मतदारांची चुकीची नोंद, हद्दीबाहेरील इमारतींतील नावनोंदणी आणि प्रभागनिहाय आकडेवारीतील तफावत इत्यादी मुद्द्यांवरून मनसेने अधिकाऱ्यांना धारेवर धरले. या वेळी अधिकाऱ्यांनी स्पष्ट उत्तरे न दिल्याने कार्यकर्त्यांना संताप अनावर हाेऊन त्यांनी कागदपत्रे उधळली. त्यामुळे काही वेळ मुख्यालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले हाेते.
ठाणे महापालिकेने प्रभागांचे नकाशे जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या मतदार याद्यांत मनमानी बदल आढळले आहेत. ठाणे महापालिका क्षेत्रातील ३३ प्रभागांपैकी काही प्रभागांमध्ये नकाशात नसलेल्या इमारतींच्या रहिवाशांची नावेही मतदार यादीत नोंदवली गेल्याचे निदर्शनास आले. अंदाजे १६ लाख ४९ हजार मतदारांपैकी चार लाख मतदारांची वाढ अवघ्या काही दिवसांत कशी झाली, असा प्रश्न मनसेचे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी उपस्थित केला आहे. शनिवारी जाधव अधिकाऱ्यांना स्पष्टीकरण विचारण्यासाठी पालिका मुख्यालयात पोहोचले असता संबंधित अधिकारी लग्नसमारंभाला गेल्याचे समजल्याने मनसे कार्यकर्त्यांनी तेथे घोषणाबाजी केली होती. त्यानंतर सोमवारी मोठ्या संख्येने कार्यकर्ते पुन्हा मुख्यालयात दाखल झाले आणि निवडणूक अधिकाऱ्यांना घेराव घालून मतदार याद्यांची पारदर्शकता संशयास्पद असल्याचा आरोप केला.
------
नेमके घडले काय?
अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी शिष्टमंडळाशी चर्चा करून परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. हद्दीबाहेरील मतदार यादीत कसे सामील झाले, याबाबत त्यांनी काही स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला; मात्र समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने पदाधिकाऱ्यांनी समोर ठेवलेली कागदपत्रे उधळून ‘निवडणूक प्रक्रिया ही संपूर्णपणे गोंधळलेली आहे,’ असा आरोप करून घोषणाबाजी केली. या गोंधळानंतर पोलिसांचे पथकही तातडीने दाखल झाले.
............................
याद्यांवरील हरकतींसाठी अपुरी मुदत?
१. महापालिकेने मतदार याद्यांवरील हरकती व सूचना नोंदवण्यासाठी २७ नोव्हेंबरपर्यंतची मुदत दिली आहे. प्रत्यक्षात पालिकेकडे छापील याद्या पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याने इच्छुक उमेदवार आणि पक्ष प्रतिनिधींना दोन दिवसांनी येण्यास सांगितले जात आहे.
२. याद्या उपलब्ध नसताना हरकतींसाठी दिलेली अल्प मुदत योग्य कशी ठरणार, असा सवाल अविनाश जाधव यांनी उपस्थित केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

