

मिरा-भाईंदर मतदार याद्यांमध्ये ‘सावळा गोंधळ’
काँग्रेस, उबाठा गटाची तक्रार
भाईंदर, ता. २५ (बातमीदार) : मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ झाल्याचा आरोप काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने केला आहे. एका प्रभागातील हजारो मतदारांची नावे दुसऱ्या प्रभागात समाविष्ट करणे, नावे वगळणे आणि दुबार नोंदी अशा गंभीर त्रुटी असल्याने, या याद्या तातडीने रद्द करून नव्याने सुधारित याद्या प्रसिद्ध कराव्यात, अशी मागणी दोन्ही पक्षांनी महापालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा यांच्याकडे केली आहे.
प्रारूप मतदार याद्या गुरुवारी (ता. २०) प्रसिद्ध झाल्या असून, त्यावर गुरुवारी (ता. २७)पर्यंत हरकती नोंदविण्याची मुदत आहे; मात्र या याद्यांवर दोन्ही विरोधी पक्षांनी तीव्र आक्षेप नोंदवले आहेत. एका प्रभागातील सुमारे तीन ते चार हजार मतदारांची नावे उसळ्या मारून दुसऱ्या प्रभागात समाविष्ट करण्यात आली आहेत. अनेक मतदारांची नावे पूर्णपणे वगळण्यात आली आहेत. तर एकाच मतदाराची दुबार नोंदणी झाल्याचेही आक्षेप घेण्यात आले आहेत. काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने नुकतीच महापालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा यांची भेट घेऊन या गंभीर त्रुटींकडे लक्ष वेधले. त्यांनी आयुक्तांकडे या याद्यांमधील गोंधळ पाहता त्या तातडीने रद्द करून नव्याने सुधारित याद्या प्रकाशित कराव्यात आणि मतदार याद्यांवर हरकत घेण्याची मुदत वाढवून देण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
या गोंधळामुळे मिरा-भाईंदरच्या निवडणुकीतील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले असून, आयुक्त सुधारणांच्या माध्यमातून मतदारांना दिलासा देणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
------------------------
केवळ एक टक्का त्रुटी!
मतदार याद्यांमधील गोंधळाच्या आरोपांबाबत आयुक्त राधाबिनोद शर्मा यांच्याकडे विचारणा केली असता, त्यांनी गोंधळाचे आरोप अंशतः फेटाळले. मतदार याद्यांमध्ये केवळ एक टक्क्याच्या आसपास चुका असू शकतात, असे स्पष्टीकरण आयुक्तांनी दिले. तरीदेखील, नागरिकांकडून आणि राजकीय पक्षांकडून आलेल्या हरकतींची दखल घेऊन त्यांची पडताळणी केली जाईल आणि आवश्यक त्या सुधारणा केल्या जातील. यासाठी महापालिकेचे कर्मचारी शनिवार व रविवार या सुट्टीच्या दिवशीदेखील काम करणार आहेत, अशी माहिती आयुक्तांनी दिली.
------------------------
बहुतांश मतदार याद्यांमध्ये एका पानावर एकाच मतदाराचे नाव छापण्यात आले आहे. त्यामुळे मतदार याद्यांचे मोठाले गठ्ठे झाले असून कागदाचा अपव्यय करण्यात आला आहे. या मतदार याद्या इच्छुकांना विकत देण्यात येत असल्याने इच्छुकांना आर्थिक भुर्दंडही बसत आहे.
- प्रमोद सामंत, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.