ठाण्यात दर डोई वाहन संख्येने कोंडीत वाढ

ठाण्यात दर डोई वाहन संख्येने कोंडीत वाढ

Published on

ठाणे कोंडीत
दरडोई एक वाहन; १६ लाख वाहनांमुळे वाढ, सार्वजनिक वाहतुकीच्या वापराचे आवाहन
ठाणे शहर, ता. २५ (बातमीदार) : सध्या ठाणे शहराची लोकसंख्या १८ लाख आणि वाहनांची संख्या १६ लाखांहून अधिक आहे. म्हणजेच दरडोई एक वाहन आहे. मर्यादित रस्ते, सुरू असलेली विविध कामे, पार्किंगची टंचाई आणि बेशिस्त वाहनचालकांची संख्या पाहता वाहतूक विभागाला वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. शहराला कोंडीमुक्त करायचे असेल तर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा, असे आवाहन ठाणे शहर वाहतूक उपायुक्त पंकज शिरसाट यांनी केले आहे. ठाणे शहराची ओळख नजीकच्या काळात वाहतूक कोंडीचे शहर म्हणून होऊ नये, यासाठी प्रत्येक नागरिकाने पुढे यायला हवे, असे आवाहनही त्यांनी केले.
मुंबईपाठोपाठ वेगाने विकसित होत असलेल्या ठाणे शहरात दळवळणासाठी सुमारे ३८० किलोमीटरपेक्षा जास्त लांबीचे रस्ते आहेत; परंतु ठाणे शहरांतर्गत असलेले अनेक जुने रस्ते अपुरे आणि अरुंद आहेत. त्यात पार्किंगची सुविधा उपलब्ध नसल्याने सर्रास रस्त्यांवरच वाहने पार्क केली जातात. याशिवाय कामावर जाणारे चाकरमानी आणि उद्योग-व्यवसायाकरिता शहरातील जड-अवजड वाहनेदेखील रस्त्यांवर मिळेल त्या जागेत तासन्तास उभी केली जातात. त्यामुळे मुख्य रस्त्यांवरील वाहतूक कोंडीची झळ अंतर्गत शहरालाही बसते. शहरातील अन्य मुख्य रस्ते व घोडबंदर रोडवर ठाणे महापालिका, मेट्रो अशा विविध प्राधिकरणांमार्फत सुरू असलेल्या विकासकामांमुळे आणि अनेकदा होणाऱ्या अपघात, दुर्घटनांच्या घटनांमुळे वारंवार अडथळे उद्भवून वाहतूक खोळंबून पडते.

वाहतूक पोलिसांची तारेवरची कसरत
ठाणे शहर वाहतूक विभाग उपलब्ध मनुष्यबळाच्या आणि ट्रॅफिक वॉर्डनच्या सोबतीने रस्त्यांवर कार्यरत आहे. परंतु वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे वाहतूक नियमन करताना वाहतूक पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागते. ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे नोंदणी केलेल्या वाहनांची संख्या पाहता ठाण्यातील प्रति माणशी एक वाहन अशी परिस्थिती दिसून येत आहे. या वाहनांव्यतिरिक्त १५ वर्षे कालावधी संपलेली बेकायदा वाहनेही उदंड आहेत.

दोन लाख ७८ हजार व्यावसायिक वाहने
अव्यावसायिक वाहनांची संख्या १३ लाख ७२ हजार ६७९ इतकी आहे.

ठाणे प्रादेशिक परिवहन विभागातील नोंदीनुसार वाहने

‘टी’ परमिट कॅब - ३९,६५८
पीकअप टेम्पो - १,३८,१६२
रुग्णवाहिका - १,११२
ऑटो रिक्षा - ८९,०४७
दुचाकी - १०,४२,३०७
चारचाकी - ३,१५,९८५

ठाणे पोलिस आयुक्तालय क्षेत्रात वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तुलनेने रस्ते व पायाभूत सुविधा अपुऱ्या आहेत. यामुळे वाहतूक कोंडीबरोबरच धूळ व हवा प्रदूषणाची समस्यादेखील वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी खासगी वाहनांचा वापर कमी करून दैनंदिन जीवनात सार्वजनिक वाहतूक सेवेचा उपयोग केल्यास या समस्या काही अंशी कमी होण्यास मदत होईल.
- पंकज शिरसाट, उपायुक्त वाहतूक शाखा, ठाणे शहर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com