ठाण्याची ''मृत्युवाहिनी''?

ठाण्याची ''मृत्युवाहिनी''?

Published on

ठाण्याची ''मृत्युवाहिनी''?
सहा वर्षांत १५०० जणांचा मृत्यू; ४०० बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार
पंकज रोडेकर : सकाळ वृत्तसेवा,
ठाणे, ता. २५ मुंबईची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी लोकल सेवा, ठाणे लोहमार्ग पोलिस ठाण्याच्या हद्दीत मागील सहा वर्षांपासून ''मृत्युवाहिनी'' ठरत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. २०१० पासून आतापर्यंत रेल्वे अपघातांमध्ये तब्बल एक हजार ५०० जणांनी आपला जीव गमावला आहे, तर अंदाजे ७५० प्रवासी जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे, मृतांपैकी सुमारे ४०० मृतदेह हे बेवारस असून त्यांची ओळख पटली नसल्याने ठाणे लोहमार्ग पोलिसांनी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली आहे.

रेल्वे प्रवासी संघटनांच्या मते, लोकलमधून पडून झालेल्या अपघाती मृत्यूंपैकी तब्बल ५८ टक्के मृत्यू हे ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा आणि डोंबिवली या पट्ट्यात झाले आहेत, ज्यात एकट्या ठाण्यात ६८ टक्के मृत्यूचे प्रमाण आहे. गर्दी आणि पायाभूत सुविधांचा अभाव यामुळे हा संपूर्ण पट्टाच ''लाइफलाईन''मधील ''रेड झोन'' बनल्याची खंत प्रवासी संघटनांनी व्यक्त केली आहे.

रेल्वे प्रशासनाला क्रॉसिंगमुळे होणारे अपघात रोखण्यात यश आले असले तरी, वाढती गर्दी आणि त्यामुळे लोकलमधून पडून होणारे अपघात मात्र दिवसेंदिवस वाढत आहेत. सध्या अपघातांमध्ये सर्वाधिक मृत्यू हे लोकलच्या प्रवासात पडून होत आहेत. मृतांमध्ये पुरुषांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे पाचवी आणि सहावी मार्गिका, फलाटांच्या लांबीचे काम युद्धपातळीवर पूर्ण करावे आणि दिव्यातून लोकल सेवा त्वरित सुरू करावी," अशी मागणी दिवा प्रवासी संघटनेचे अध्यक्ष ऍड. आदेश भगत यांनी केली आहे.

अपघाताची मूलभूत कारणे
जीवघेणी गर्दी: ठाणे हे मोठे जंक्शन असल्याने पुढील स्टेशन – कळवा, मुंब्रा, दिवा – येथे लोकलमध्ये जीवघेणी गर्दी होते.
तीव्र वळणे: मार्गावरील तीव्र वळणांमुळे ट्रेन झुकते, ज्यामुळे दारावर उभा असलेला प्रवासी थेट बाहेर फेकला जातो.
सेवा कमी: एसी लोकल वाढल्यामुळे नॉन-एसी लोकलची संख्या कमी झाली आहे, परिणामी उर्वरित लोकलमध्ये गर्दीचा दाब वाढतो.
अपूर्ण कामे: दिवा आणि कळवा येथे अजूनही योग्य रेल्वे ओव्हर ब्रीज नाहीत.

ही अपघातांची मालिका नसून हा सिस्टेमिक फेल्युअर आहे. ठाणे–कळवा–मुंब्रा–दिवा हा पट्टा आज मुंबईच्या जीवनवाहिनीमधील ''रेड झोन'' बनला आहे. जीव वाचवण्याची जबाबदारी पुढे ढकलू नये, तातडीने उपाय करावेत.
- सिद्धार्थ देसाई, अध्यक्ष, रेल्वे प्रवासी संघ, कळवा

वर्षात रेल्वे अपघातात २३३ जणांचा मृत्यू झाला, ज्यात २०७ पुरुष आणि २६ महिला प्रवासी होत्या. मृतांची ओळख पटली नाही, तर त्यांच्यावर पोलिसांमार्फत अंत्यसंस्कार केले जातात. त्यापूर्वी त्यांच्याजवळ सापडलेल्या वस्तू आणि डीएनए नमुने जपून ठेवले जातात.
-अर्चना दुसाने, वरिष्ठ पोलिस निरीक्षक


रेल्वे अपघात तक्ता
वर्ष मृत्यू जखमी
वारस / बेवारस वारस
२०२० १०७/ ३४ ५६
२०२१ १३३/ ५१ ८२
२०२२ १९३/ ८२ १३१
२०२३ २२४/ ८७ १२१
२०२४ २१९/ ७८ १७३
२०२५ १६७/ ६५ १७८
एकूण १,०४३/३९७ ७४१

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com