कोस्टलमुळे विस्थापनाचे संकट

कोस्टलमुळे विस्थापनाचे संकट

Published on

कोस्टलमुळे विस्थापनाचे संकट
प्रकल्पबाधित शेतकरी भेटले ठाणे महापालिका आयुक्तांना

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २५ : ठाण्याच्या वाहतूक व्यवस्थेला नवे बळ देणारा कोस्टल रोड प्रकल्प जरी शहरासाठी महत्त्वाचा असला तरी या प्रकल्पामुळे घोडबंदर परिसरातील अनेक शेतकऱ्यांसमोर विस्थापनाचे संकट ओढावणार आहे. पिढ्यानपिढ्या कसत असलेल्या जमिनींच्या मुळावर हा प्रकल्प येत आहे. याबाबत वाघबीळ, भाइंदरपाडा, कोलशेत, बाळकूम परिसरातील शेतकऱ्यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेतली. या वेळी प्रकल्पाला विरोध नसून मालकी हक्कासोबत मेट्रो कारशेडच्या धर्तीवर योग्य मोबदला देण्याची मागणी करण्यात आली.
--
ठाणे ते गायमुख १५ मिनिटांवर
घोडबंदर मार्गावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या अशा कोस्टल रोडचे काम प्रस्तावित आहे. बाळकूम ते गायमुख असा हा प्रकल्प असून, मुंबई-नाशिक महामार्गाला जोडणारा हा मार्ग असणार आहे. त्यामुळे ठाणे ते गायमुख हा प्रवास अवघ्या १५ मिनिटांवर येणार आहे. मात्र या प्रकल्पामुळे घोडबंदर आणि आसपासच्या भागातील अनेक शेतकरी कुटुंबे विस्थापित होणार आहेत. १०० वर्षांहून अधिक काळ हे शेतकरी सरकारी जमिनी कसत आहेत. अतिक्रमण न करता सातत्याने शेती करून जमीन जिवंत ठेवली आहे.
--
जमीन सांभाळली
भाइंदरपाडा येथील जमिनीवर गो एअरवेजचे टायटल असल्याचे नोंदीत आहे. प्रत्यक्षात मात्र येथे कोणतीही कंपनी सुरू झाली नाही; उलट भूमिपुत्रांनी वर्षानुवर्षे शेती करून जमीन सांभाळली आहे. त्यामुळे ‘हक्क आमचा, टायटलही आमचंच असावं’ अशी भूमिका शेतकऱ्यांची आहे. ती मांडण्यासाठी वाघबीळ, भाइंदरपाडा, कोलशेत, बाळकूम परिसरातील शेतकऱ्यांनी शिवसेना शिंदे गटाचे विभागप्रमुख रवि घरत यांच्या नेतृत्वाखाली पालिका आयुक्त सौरभ राव यांची मंगळवारी (ता. २५) भेट घेतली. या वेळी कसत असलेल्या मालकी जमिनींपैकी ५० टक्के भागाचा ताबा द्यावा,
तर सरकारी जमिनी कसत असल्यास २५ टक्के हक्क शेतकऱ्यांच्या नावावर करावा, तसेच मेट्रो कारशेड प्रकल्पाप्रमाणे आर्थिक मोबदला देण्यात यावा या प्रमुख मागण्या करण्यात आल्या.
--
न्याय मिळेल
शेतकऱ्यांच्या हक्कांसंदर्भात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी आधी भेट घेतली. त्यांच्या पुढाकाराने आयुक्तांशी बैठकीची व्यवस्था झाली. चर्चा सकारात्मक झाली असून शेतकऱ्यांना निश्चितच न्याय मिळेल, अशी माहिती रवि घरत यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com