राजकीय वादातून रिक्षाचालकाला बेदम मारहाण
उल्हासनगर, ता. २५ (वार्ताहर) : उल्हासनगरात सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर भरदिवसा रिक्षाचालकाला बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिंदे गटाचे महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी यांच्या कार्यकर्त्यांचा कथित सहभाग असलेला हा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर शहरात कायदा-सुव्यवस्थेच्या स्थितीबद्दल चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
व्हिडिओमध्ये योगेश पवार या रिक्षाचालकाला रस्त्यावर ओढत नेऊन त्याला मारहाण केल्याचे स्पष्ट दिसते. हाणामारीदरम्यान शिवीगाळ, धमक्या आणि गोंधळाचा आवाज ऐकू येत असून, त्याचवेळी एका समर्थकाकडून या प्रकाराचे चित्रीकरण केले जात असल्याचेही दिसत आहे. अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरातील नागरिक घाबरून गेले असून समाजमाध्यमांवर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. घटनेचा विस्तार केवळ एका व्यक्तीपुरता न राहता राजकीय वैमनस्यातून आणखी काही लोकांना लक्ष्य केल्याचे समोर आले आहेत. या प्रकरणामुळे शहरातील वातावरण अधिकच तणावपूर्ण झाले आहे.
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिस यंत्रणेकडून प्राथमिक चौकशी सुरू करण्यात आली आहे. मारहाण झालेल्या रिक्षाचालकासह बेहनवाल कुटुंबीयांनी तत्काळ न्याय आणि सुरक्षा देण्याची मागणी केली आहे. शहरातील राजकीय वातावरण तापले असून, पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.
कायद्याचा बालेकिल्ल्याला तडा
अंबरनाथमध्ये पोलिसांनी काही दिवसांपूर्वी गुन्हेगारांची धिंड काढत ठाणे जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला असल्याचा संदेश दिला होता. मात्र, उल्हासनगरातील भरदिवसाच्या हाणामारीने आणि राजकीय वैमनस्यातून झालेल्या हल्ल्यांनी आता या बालेकिल्ल्याच्या भिंतींना तडे गेल्याची भावना नागरिकांत वाढली आहे. सत्ताधारी पक्षाशी संबंधित काही कार्यकर्तेच उघडपणे हातात कायदा घेत असल्याचे चित्र समोर येत असल्याने नागरिकांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

