रेल्वेच्या मुजोर अधिकाऱ्यांना वठणीवर आणा - खासदार नरेश म्हस्के
मुजोर अधिकाऱ्यांना वठणीवर आणा
रेल्वेच्या सल्लागार समिती बैठकीत नरेश म्हस्के यांनी ठणकावले
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २५ : ठाणे-मुलुंड स्थानकांदरम्यानच्या नवीन रेल्वेस्थानकाच्या कामात दिरंगाई होत आहे. याबाबत दिल्लीतील संसद भवनात खासदार नरेश म्हस्के यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासमोर खंत व्यक्त केली. तसेच विकासकामे तातडीने मार्गी लावण्याची मागणी केली. प्रवाशांना सोयी-सुविधा पुरविण्यात हलगर्जी करणाऱ्या मुजोर अधिकाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी कारवाई करण्याची सूचनाही खासदार नरेश म्हस्के यांनी केली.
रेल्वेच्या सल्लागार समितीची एक बैठक मंगळवारी (ता. २५) दिल्लीत केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमन्ना, रवनीत सिंह उपस्थित होते. या समितीत देशभरातील १५ खासदार हे सदस्य म्हणून सहभागी झाले. या वेळी ठाणे लोकसभा मतदारसंघातील ठाणे, दिघा, ऐरोली, बेलापूर, वाशी, भाईंदर, मिरा रोड या स्थानकांमधील प्रलंबित विकासकामे मार्गी लावण्याची मागणी त्यांनी केली.
--
प्रस्तावाला मंजुरी द्या
अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत ठाणे रेल्वे स्थानकाच्या आधुनिकीकरणाचा ९४९ कोटींचा प्रस्ताव मध्य रेल्वेने रेल्वे बोर्डाकडे पाठविला आहे. तो अद्याप प्रलंबित आहे. या प्रस्तावाला तत्काळ मंजुरी देण्याची मागणी म्हस्के यांनी केली. ठाणे ते मुलुंड स्थानकांदरम्यान नवीन रेल्वेस्थानकाचे काम तातडीने सुरू करावे. ठाणे स्थानकात मुलुंडकडे जाणारा नवीन पादचारी पूल त्वरित बांधण्याची आवश्यकता आहे.
--
समन्वय अधिकारी हवा
सार्वजनिक शौचालये, पिण्याचे पाणी, एक्सलेटर, शेड अशा मूलभूत सोयी-सुविधा देणे गरजेचे असताना मुजोर अधिकारी केबिनमध्ये बसून असतात. या देशभरातील मुजोर अधिकाऱ्यांना वठणीवर आणणे गरजेचे असल्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी बैठकीत ठणकावले. रेल्वेविषयक काम करीत असताना चर्चा, संवाद, सूचना आणि अंमलबजावणी होण्यासाठी देशभरातील खासदारांसाठी समन्वय अधिकारी नेमण्याची महत्त्वपूर्ण सूचना खासदार नरेश म्हस्के यांनी सर्व खासदारांच्या वतीने बैठकीत केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

