घनकचरा व्यवस्थापनासाठी सिडकोकडे पाठपुरावा

घनकचरा व्यवस्थापनासाठी सिडकोकडे पाठपुरावा

Published on

घनकचरा व्यवस्थापनासाठी सिडकोकडे पाठपुरावा
डम्पिंग ग्राउंडअभावी पनवेल ग्रामपंचायतीसमोर आव्हान
कामोठे, ता. २६ (बातमीदार) : पनवेल तालुक्यातील तब्बल ७१ ग्रामपंचायतींकडे स्वतंत्र डम्पिंग ग्राउंड नसल्यामुळे घनकचरा व्यवस्थापनाचा प्रश्न गंभीर बनला असून, या समस्येवर तोडगा काढण्यासाठी पनवेल पंचायत समितीने सिडकोकडे ठोस प्रयत्न सुरू केले आहेत. सिडको व नैना नियोजन प्राधिकरणांतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायतींमध्ये निर्माण होणाऱ्या कचऱ्यावर सिडकोच्या यंत्रणेमार्फत प्रक्रिया करण्यात यावी, यासाठी पंचायत समिती सातत्याने पाठपुरावा करीत आहे.
स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण)अंतर्गत ग्रामीण भागात घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. ग्रामपंचायतींना कुटुंब संख्येनुसार निधी देण्याची तरतूद असली तरी पनवेल तालुक्यात मोठ्या प्रमाणावर वाढलेली लोकसंख्या व शहरीकरणामुळे हा निधी अपुरा ठरत आहे. अनेक गावांमध्ये आजही ओला व सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण न करता सरसकट कचरा रस्त्याच्या कडेला, मोकळ्या जागांवर तसेच नदीपात्रात टाकण्यात येत आहे. काही ठिकाणी रात्री उघड्यावर कचरा जाळला जात असल्याने नागरिकांना दुर्गंधी व धुराचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
कासाडी आणि गाढी नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणावर कचरा टाकला जात असून, त्यामुळे नदी प्रदूषणात भर पडत आहे. जैव-वैद्यकीय कचऱ्याचा यात समावेश असल्याने नागरिकांच्या आरोग्यावरही गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. कचऱ्यातील उरलेल्या अन्नपदार्थांमुळे भटक्या कुत्र्यांचा वावर वाढून अपघात व चावण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर पनवेल पंचायत समितीने स्वच्छ भारत मिशन ग्रामीणअंतर्गत १४५ गावांमध्ये घनकचरा व्यवस्थापनासाठी मोठ्या प्रमाणावर सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. यामध्ये ५७,५५५ घरगुती कचराकुंड्या, ६३२ वैयक्तिक कम्पोस्ट किट, २०३ सार्वजनिक कम्पोस्ट पिट, २०२ प्लास्टिक संकलन केज आणि १३९ कचरा वाहतूक वाहने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. तसेच सिडको-नैना अधिसूचित क्षेत्रातील २८ ग्रामपंचायतींचे प्रस्ताव पंचायत समितीला प्राप्त झाले असून, ते पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात आले आहेत.
...................
ग्रामपंचायतींकडून प्राप्त झालेले प्रस्ताव सिडकोला पाठविण्यात आले आहेत. सिडकोच्या घनकचरा प्रकल्पात ग्रामपंचायत हद्दीतील कचऱ्याचे व्यवस्थापन व्हावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यासंदर्भात सिडकोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठकही पार पडल्याचे पनवेल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी समीर वाठारकर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com