रायगड बातम्या
लाईट ऑफ लाईफ ट्रस्टतर्फे पालक मेळावा उत्साहात
अलिबाग (वार्ताहर) : लाईट ऑफ लाईफ ट्रस्टच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही आनंदो प्रकल्पांतर्गत पालक मेळाव्याचे भव्य आयोजन मंगळवारी (ता. २५) गरूडपाडा–बामणगाव येथील दादा गार्डन हॉलमध्ये करण्यात आले. पालकांचा सहभाग, मुलांच्या प्रगतीबाबत जागृती आणि सामाजिक बांधिलकी वाढवणे हा या मेळाव्याचा मुख्य उद्देश होता. कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमोद काशिनाथ भोपी, अतुल हेमंत गुरव, सुरेश जानू पाटील, प्रकल्प समन्वयक आर्या राऊत, आनंदो ऑफिसर अनुजा राऊळ आणि अनंत प्रकल्पाचे वरिष्ठ अधिकारी जगदीश पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाले. या मेळाव्यात बोर्ली, वळके, रामराज व बेलोशी परिसरातील तब्बल २७८ पालकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. पालकांसाठी पाककला स्पर्धा, टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार करणे, समूहगीत आणि सामूहिक नृत्य अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. तसेच मनोरंजनात्मक खेळांचीही रेलचेल होती. स्पर्धांमध्ये विजयी झालेल्या पालकांचा गौरवपत्र व बक्षिसे देऊन सत्कार करण्यात आला.
ट्रस्टच्या माध्यमातून शिक्षण घेत स्वतःच्या पायावर उभे राहिलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आर्या राऊत, अनुजा राऊळ, रश्मी अष्टमकर, राणी जाधव, अपेक्षा शेळके, सोनल घरत आणि सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.
............
नळेफोडी येथे ‘संविधान दिन’ उत्साहात
माणगाव (वार्ताहर) : रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नळेफोडी व अंगणवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने झाली. या प्रसंगी उपस्थित ग्रामस्थ व विद्यार्थ्यांना संविधानाची उद्देशिका वाटप करण्यात आली. शाळेचे मुख्याध्यापक अनिल नाचपले यांनी आपल्या मार्गदर्शनातून संविधानातील ७४ शब्दांचा अर्थ अत्यंत सोप्या भाषेत समजावून सांगितला. घर-घर संविधान, उपक्रमाच्या अंतर्गत घेण्यात आलेल्या संविधान गुणगौरव परीक्षा २०२५, या परीक्षेत विद्यार्थ्यांनी यशस्वी सहभाग घेतला. या कार्यक्रमात राष्ट्राची एकता आणि अखंडता अबाधित ठेवण्याचा सर्वांनी सामूहिक संकल्प केला. संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळी अंगणवाडी सेविका, सहाय्यक कर्मचारी, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
...........
सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे शहिदांना आदरांजली
पेण (वार्ताहर) : २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात वीरमरण आलेल्या शहिदांच्या स्मरणार्थ सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने महात्मा गांधी वाचनालय येथे श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमात पोलिस निरीक्षक संदीप बागुल यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना या हल्ल्यात अनेक भारतीय आणि ३४ परदेशी नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. अनेक पोलिस अधिकारी आणि जवानांनी देशासाठी बलिदान दिल्याचे त्यांनी सांगितले. हा दिवस राष्ट्रासाठी अत्यंत दुःखद असून, दरवर्षी अशा प्रकारे कार्यक्रम आयोजित करून शहिदांच्या स्मृतींना उजाळा देण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. कार्यक्रमात सह्याद्री प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष समीर म्हात्रे, महात्मा गांधी वाचनालयाचे अध्यक्ष अरविंद वनगे, सुहास पाटील, अशोक मोकल, प्रविण पाटील, अशोक जैन तसेच अनेक सदस्य उपस्थित होते.
.............
श्रमिक माध्यमिक विद्यालय चिल्हे येथे संविधान दिवस उत्साहात
रोहा (बातमीदार) : रोहा तालुक्यातील श्रमिक माध्यमिक विद्यालय चिल्हे येथे भारतीय संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मुख्याध्यापक दीपक जगताप यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी संविधानाचे महत्त्व, उद्दिष्टे आणि लोकशाही मूल्यांवर भाषणे दिली. तसेच संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. या कार्यक्रमाला शिक्षकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
...............
तळा ज्युनिअर कॉलेजमध्ये संविधान दिन उत्साहात साजरा
तळा (प्रतिनिधी) : तळा येथील कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने झाली. विद्यार्थिनी ईशा पांचाळ यांनी उद्देशिकेचे वाचन केले. प्राध्यापक एन.सी. पाटील व पी. पी. कसबे यांनी संविधानाची निर्मिती, बाबासाहेबांचे योगदान व नागरिकांचे हक्क याबाबत मार्गदर्शन केले. त्यानंतर भव्य जनजागृती रॅली काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी संविधान सन्मानाचा संदेश देत परिसरात जनजागृती केली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मूल्यांची जाणीव अधिक दृढ झाल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

