शेतकऱ्यांची रब्बीवरच मदार

शेतकऱ्यांची रब्बीवरच मदार

Published on

शहापूर, ता. २६ (वार्ताहर) : यंदा पावसाच्या अतिप्रमाणामुळे भात, नाचणी आणि खरीप हंगामातील उडीद, तीळ तसेच कडधान्याच्या पिकांना फटका बसल्याने त्याची भरपाई करण्याच्या उद्देशाने शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील पिकांच्या आंतर मशागतीच्या कामांना वेग दिला आहे.
दुबार भातपिके घेणाऱ्या शेतकऱ्यांनी मशागत सुरू केली आहे. सिंचन क्षमता असलेले तालुक्यातील शेकडो शेतकरी दुबार भातपिके घेत असून, खरीप हंगामात झालेल्या नुकसानाची भरपाई त्यांना रब्बी हंगामातील भातपिकांमधून मिळविता येते. पाऊस लांबल्याने यंदा रब्बी हंगामातील पिकांची लागवडही उशीरा करावी लागली. त्यामुळे एकीकडे बाजारपेठेत हंगामी भाजीपाल्याचा तुटवडा भासत आहे. तर दुसरीकडे शहापूर तालुक्यातून भारताबाहेर निर्यात करण्यात येणाऱ्या निर्यातक्षम भेंडीची निर्यातही उशीरा सुरू होणार आहे. परिस्थिती अशी असली तरी तिचा सामना करून खरीप हंगामात हातून पिके गेलेले शेतकरी सध्या रब्बी हंगामात कडधान्य, दुबार भातपिके, भाजीपालावर्गीय पिकांच्या माध्यमातून नफा मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत.

तालुक्यातील पीक
सध्या तालुक्यात मूग ३६ हेक्टर, हरभरा १२९ हेक्टर आणि वाल १७६ हेक्टर जमीनक्षेत्रात पेरणी करण्यात आली आहे. ११५ हेक्टर क्षेत्रात भेंडीची लागवड करण्यात आली आहे. तर ३६ हेक्टर क्षेत्रात काकडी, १५ हेक्टर क्षेत्रात शिरवळ, ५ हेक्टर क्षेत्रात कारळी, ३.७० हेक्टर क्षेत्रात वांगी, ७.५० हेक्टर क्षेत्रात घोसाळी, तीन हेक्टर क्षेत्रात गवार, एक हेक्टर क्षेत्रात पालक आणि तिखट मिरची व ढोबळी मिरचीच्या लागवडीसाठी रोपे तयार करण्याची लगबग सुरू आहे.

यावर्षी अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिके हातातून गेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट असून, वर्ष कसे जाईल या विवंचनेत ते आहेत. आता सर्व मदार रब्बी हंगामातील पिकावर आहे. कडधान्य व भाजीपाला पीक चांगले येण्याच्या स्थितीत आहे. पुढे निसर्ग काय करेल, हे सांगता येत नाही. त्यामुळे पीक घरात येईपर्यंत काहीच भरवसा नसतो.
- राजाराम खाडे, कृषी पर्यवेक्षक, शहापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com