जिल्ह्यात ‘मळणी’चा उत्सव सुरू

जिल्ह्यात ‘मळणी’चा उत्सव सुरू

Published on

जिल्ह्यात ‘मळणी’चा उत्सव सुरू
शेतात कुटुंबातील सर्व मंडळी राबण्याची परंपरा
अलिबाग, ता. २६ (वार्ताहर) ः जिल्ह्यात भातकापणीनंतर मळणीच्या कामाला वेग आला आहे. अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या भातशेतीतून उरले सुरलेले धान्य आपल्या कणगीत पडावे यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. वाढती मजुरी व मजुरांची कमतरता भासत असल्याने शेतकरी कुटुंबातील सर्व सदस्य कापणी, झोडणी, मळणी व बांधणीच्या कामाला लागले आहेत. या कामादरम्यान ही मंडळी अनेक गमतीजमती, गाणी, जेवण अशी मजाही घेत आहेत.
यावर्षी पावसाने आपला मुक्काम वाढविल्याने रायगड जिल्ह्यात भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे पाऊस थांबल्यानंतर तातडीने कापणी करून शेतकरी आता मळणीच्या कामात व्यग्र झाला आहे. नोकरीनिमित्त शहरात गेलेले तरुण सुट्टी काढून खासकरून शेतीच्या कामाला गावी आले आहेत. मळणी काढण्यासाठी भल्या पहाटे शेतात दाखल होत आहेत. ग्रामीण भागात आजही खळ्यांवर मोकळ्या आकाशात झोडणीची कामे होत आहेत. खळ्यांमध्ये पडलेला भात पोत्यात भरून घरात आणून टाकण्याचे काम सुरू आहे. शेतामध्ये भाताच्या लोंब्या पिवळ्या धम्‍मक झाल्या, की भाताचे भारे बांधून ते एकत्रित रचून ठेवले जातात. त्याला उडवी म्हणतात आणि मग सोयीची वेळ बघून शेतकरी, त्याचे कुटुंब व आजूबाजूचे सहकारी एकत्रित येत मळणी म्हणजेच भातझोडणीचे काम सुरू करतात. याच मळणीतून मिळणारे भात म्हणजे शेतकऱ्यांची कमाई आणि कष्टाचे चीज असते. मळणी म्हणजे एक मोठा सोहळा साजरा केला जातो. संपूर्ण गावच मळणीसाठी एकत्र यायचे. अगदी लहान मुलांपासून वृद्धापर्यंत सर्व जण या मळणीचा शेतावरती मनसोक्त आनंद घेतात. मजुरांच्या कमतरतेमुळे काही ठिकाणी यंत्राने मळणी केली जाते.
...................
चौकट :
मळणीची पारंपरिक पद्धत
शेतावर शेणाने सारवून मळणीसाठी जागा तयार करतात त्याला खळे असे म्हणतात. काही ठिकाणी शेतात नाही तर घराजवळ खळ्याची जागा तयार केली जाते. खळ्यात मध्यभागी पारंपरिक पद्धतीने एक मोठा लाकडी खुंट पुरला जातो. या खुंट्याला आंब्याची डहाळी बांधली जाते. मळणीच्या ठिकाणी शेतातील देवतेला नैवेद्य दाखवून कामाला सुरुवात होते. यंत्राने मळणी करायची असली तरी त्याची सुरुवात मात्र अशाच पद्धतीने होते. मळणी सकाळी लवकर करण्याची पद्धतही कायम आहे. उडव्यातून दोन हाताच्या कवेत मावतील एवढे भारे खळ्यात रचतात. त्यातील भारा पारंपरिक पद्धतीने लाकडी ओंडका नाही तर दगडांवर झोडून मळणीला सुरुवात केली जाते. सध्या अशी अनेक खळी शेतात पाहावयास मिळतात.
...............

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com