डहाणूत प्रतिष्ठेची निवडणूक रंगणार

डहाणूत प्रतिष्ठेची निवडणूक रंगणार
Published on

कासा, ता. २७ (बातमीदार) : डहाणू नगरपरिषद निवडणुकीत यंदा थेट नगराध्यक्षपदासाठी भाजप विरुद्ध सर्वपक्षीय महाआघाडी अशी सरळ लढत रंगणार असून चूरस वाढली आहे. माजी नगराध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांच्याविरुद्ध माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र माच्छी अशी थेट टक्कर होणार आहे. राज्यात सत्तेत भागीदार असलेले भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) एकमेकांसमोर उभे ठाकल्याने ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे.

डहाणू नगराध्यक्षपदासाठी चार उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते, मात्र अंतिम दिवशी काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव ठाकरे गट) उमेदवारांनी माघार घेत शिवसेनेच्या (शिंदे गट) उमेदवाराला समर्थन दिले. त्यामुळे मुख्य लढत भाजप विरुद्ध सर्वपक्षीय आघाडी अशी उरली आहे. २७ नगरसेवकपदांसाठी ६५ उमेदवार रिंगणात असून ३८,६९३ मतदार निवडणुकीत आपला कौल नोंदवतील.

२०१७ मध्ये डहाणू नगरपरिषदेत भाजपने नगराध्यक्ष पदासह १५ जागा जिंकत एकहाती सत्ता मिळवली होती. आता भाजपने ‘एकला चलो’चा नारा दिल्यानंतर शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी (अजित पवार) यांनी भाजपसोबतची युती मोडून शिवसेना (शिंदे) उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला. भाजपच्या कार्यकाळात विकास थांबला, एकाधिकारशाही वाढली आणि काही विशिष्ट गटाला लाभ मिळाला, असे आरोप सर्वपक्षीय आघाडी मतदारांसमोर मुद्दे मांडत आहे, तर भाजपने पाच वर्षांत केलेल्या विकासकामांचा दाखला देत मतदार भाजपलाच पुन्हा कौल देतील, असा विश्वास व्यक्त केला आहे.

संवेदनशील क्षेत्रामुळे कामांवर बंधने
पर्यटन विकास, विकासकामांचा दर्जा, विकास आराखडा, १९९१ पर्यावरण संवेदनशील क्षेत्र अधिसूचना, नगरपरिषद इमारत, कचरा व्यवस्थापन, कंक्राडी नदी पूर या विषय हाताशी धरून प्रचाराला वेग आला आहे. डहाणू शहराला पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्राचा दर्जा असल्याने विकास आराखड्यातील कामांवर बंधने येतात. रस्ते रुंदीकरण, जमीन अधिग्रहण, मोबदला आणि न्यायालयीन लढाया या मुद्द्यांवरून मोठा विरोध निर्माण झाला. त्यामुळे नागरिकांना विश्वासात घेऊनच शहराचा विकास साधणे गरजेचे असल्याचे सुचविले जात आहे.

निवडणूक लक्षवेधी ठरणार
डहाणू शहराचा विकास, पर्यावरणीय बंधने, महाआघाडी विरुद्ध भाजप यातील सरळ टक्कर आणि प्रमुख मुद्द्यांच्या पार्श्वभूमीवर डहाणू नगरपरिषद निवडणूक यंदा लक्षवेधी ठरणार आहे. त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोघेही प्रचाराला येऊन गेल्याने वातावरण ढवळून निघाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com