नंदी बाबा चौकातील पदपथांवर अतिक्रमण
नंदीबाबा चौकात कोंडीचा चौक
पदपथांवर दुकानदारांचे अतिक्रमण, पादचाऱ्यांचा जीव धोक्यात
ठाणे शहर, ता. २६ (बातमीदार) ः नंदीबाबा चौकात सकाळ-संध्याकाळी प्रचंड वाहतूक कोंडी होते. कापूरबावडी आणि ढोकाळी या दोन्ही नाक्याची वाहतूक या चौकात येत असल्याने येथे वाहनांची मोठी गर्दी असते. त्यामुळे हा चौक कोंडीचा चौक म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. कोंडीच्या या चौकातील पदपथावर दुकानदारांनी अतिक्रमण केल्याने पादचाऱ्यांना जीव धोक्यात घालून वाहनांच्या गर्दीतून चालावे लागते. ठाणे महानगर पालिका आणि वाहतूक विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे.
कोलशेत परिसरात मोठ्या प्रमाणात रहिवासी इमारतींचे काम सुरू आहे. या ठिकाणी शेकडो एकर जागेवर नव्या इमारती उभ्या राहत आहेत. हजारो फ्लॅट बांधून झाले असून त्यामध्ये रहिवासी राहायला आले आहेत. या सर्वांना दळणवळणासाठी नंदीबाबा चौकाचा वापर करावा लागतो. त्यामुळे या चौकात वाहनांची मोठी गर्दी असते. ब्रह्मांड मनोरमा नगर आणि पाथरी पाडा परिसरातील संकुलासाठी ही या चौकाचा वापर केला जातो. त्यामुळे येथे रोजच मोठी वाहतूक कोंडी होत असते. वाहतूक विभागाला रोज या ठिकाणी वाहतुकीच्या नियोजनाकरिता कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी लागते. परंतु, या चौकात मोठी वाहतूक कोंडी होत असतानाही येथील रस्त्याच्या पदपथावर दुकानदारांनी अतिक्रमण केले आहे.
पदपथाचा व्यवसायासाठी वापर
स्मशानभूमीसमोरील पदपथ दुकानदारांनी घशात घातले आहेत. पदपथावरच सिलेंडर ठेवून त्यावर खाद्यपदार्थ तयार केले जात आहेत. त्यामुळे पादचाऱ्यांना वाहनांच्या कोंडीमधून जावे लागत आहे. चौकाच्या ठिकाणीच दुकानदाराने पदपथावर अतिक्रमण केले असून दुकानासमोर मोठ्या प्रमाणात ग्राहकांकडून अनाधिकृत पार्किंग केली जाते. या पार्किंगमुळे वाहतूक कोंडी होत असून वाहतूक विभागाचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे. पदपथावर खाद्यपदार्थ तयार करून विकले जात असतानाही ठाणे पालिकेचा अतिक्रमण विभागाकडून त्याकडे दुर्लक्ष होत आहे. दुकानासमोर अनाधिकृत शेड बांधले असून या शेडखालील पदपथाचा व्यवसायासाठी वापर होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

