देशात पालघर वेगाने विकसित होणारा जिल्हा

देशात पालघर वेगाने विकसित होणारा जिल्हा

Published on

पालघर जिल्हा वेगाने विकसित होतोय!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

पालघर, ता. २६ ः पालघर जिल्हा हा देशात सर्वात वेगाने विकसित होणारा महाराष्ट्रातील जिल्हा आहे. पालघरमध्ये विकासाची गंगा वाहत आहे. जिल्ह्यामध्ये जल, जंगल, जमीन यांना बाधा न पोहोचवता विकासाचा आराखडा करायचा असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले.
मिश्रा मैदान येथे बुधवारी प्रचार सभा झाली. या वेळी राज्याचे वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, खासदार डॉ. हेमंत सवरा, आमदार सर्वश्री राजन नाईक, हरिश्चंद्र भोये, स्नेहा दुबे-पंडित, ज्ञानेश्वर म्हात्रे, भाजप जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांच्यासह पालघर नगराध्यक्षपदाचे भाजपचे उमेदवार कैलास म्हात्रे, नगरसेवकपदाचे उमेदवार आणि विविध पदाधिकारी उपस्थित होते. शहरीकरणाला नियोजन नसल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. हा अभिशाप नसून संधी म्हणून त्याकडे आम्ही पाहतो. ६५ टक्के जीडीपी हा शहरातून येतो. म्हणून शहराला शाश्वत नियोजनबद्ध विकासाकडे नेण्याची आमची प्राथमिकता असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. घरात शुद्ध पिण्याचे पाणी, भुयारी गटार योजना, सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प, दवाखाने, शाळा, सुंदर उद्याने, चांगले रस्ते व इतर पायाभूत सुविधा यांच्यामध्ये आमूलाग्र बदल करून चांगली शहरे घडवण्याचा आमचा मानस असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

महापालिकेचे संकेत
पालघरमध्ये अनेक विकास प्रकल्प येत आहेत. शहरीकरण झपाट्याने वाढत असल्याने ती विस्तारत आहेत. त्यामुळे भविष्यात पालघरचे रूपांतर महापालिकेत करण्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले. अतिक्रमण नियमित करणे, घराखालचे पट्टे देणे, झोपड्या असलेल्यांना घरे देणे हे आमचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. पालघर जिल्ह्यात आमचे लोकप्रतिनिधी चांगली कामे करीत आहेत. जो प्रतिनिधी चुकेल त्यांचे कान धरायला मागे-पुढे पाहणार नाही आणि पुढे त्यांच्याकडून चांगली कामे करून घेऊ, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

वाढवण बंदर उभारणी दोन-चार वर्षांत
एक लाख कोटी रुपये खर्च करून जगातील दहा क्रमांकाचे आणि देशातील पहिले हरित वाढवण बंदर प्रकल्प हा रोजगार निर्मितीसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. हे बंदर उभे राहत असताना येथील मच्छीमार समाजाच्या रोजगारावर गदा येणार नाही, असे काम आम्ही करत आहोत. शाश्वत मासेमारीच्या अटी टाकून त्यांना संरक्षित करूनच हे बंदर उभारण्याचे ठरवले आहे. पुढील तीन-चार वर्षांत जेव्हा बंदराची निर्मिती होईल. त्या वेळी ५६ कंपन्यांसोबत करार करून त्याअंतर्गत प्रशिक्षित केलेल्या येथील तरुण-तरुणींना मोठा रोजगार मिळणार आहे. बंदरामुळे दहा लाख रोजगारनिर्मिती होणार आहे. या रोजगारांमध्ये स्थानिक भूमिपुत्रांना प्राधान्य देण्यात येणार आहे. देशातील पहिले तरंगते विमानतळ याच पालघरमध्ये येत आहे. मुंबईच्या कोस्टल रोडचा विस्तार डहाणूपर्यंत करायचे आहे. पालघरमध्ये चौथी मुंबई वसवणार असून विकासाचे चांगले मॉडेल म्हणून पालघर जिल्हा ओळखला जाईल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com