बदलापूर ते कर्जत तिसरी-चौथी मार्गिकेला मंजूर

बदलापूर ते कर्जत तिसरी-चौथी मार्गिकेला मंजूर

Published on

बदलापूर ते कर्जत तिसरी-चौथी मार्गिका
केंद्राची मंजुरी; उपनगरीय प्रवाशांना दिलासा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २६ : कल्याण-कर्जत मार्गावरील प्रवाशांची वाढती गरज लक्षात घेता, बदलापूर ते कर्जतदरम्यानच्या तिसऱ्या-चौथ्या मार्गिकेला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेत झालेल्या आर्थिक व्यवहार समितीच्या बैठकीत या प्रकल्पाला हिरवा कंदील देण्यात आला. त्यामुळे लोकल आणि मेल-एक्स्प्रेस गाड्यांना स्वतंत्र मार्गिका मिळणार असून, परिणामी लाखो प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
मागील काही वर्षांत महामुंबईचा कल्याणपुढे बदलापूर ते कर्जतपर्यंत मोठ्या प्रमाणात विस्तार झाला. शिक्षण-नोकरीनिमित्त या भागातील लाखो प्रवासी दररोज लोकलने मुंबई, ठाण्याला येतात. त्यामुळे कल्याण ते कर्जतदरम्यान दररोज प्रचंड गर्दी असते. याशिवाय पुण्याच्या दिशेने जाणारी रेल्वे वाहतूकही या मार्गावरून सुरू असते. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने बदलापूर ते कर्जतदरम्यान तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेला मंजुरी दिली आहे. त्यामुळे या मार्गावर लोकल आणि एक्स्प्रेस-गाड्या अधिक प्रमाणात चालवता येतील. दरम्यान, या बैठकीत ओखा ते कनालूस या १४१ किमी मार्गाच्या दुपदरीकरणालाही मंजुरी देण्यात आली.
---
प्रकल्पाची वैशिष्ट्ये
मोठे पूल - ८
लहान पूल - १०६
रोड अंडरब्रिज - १
स्थानके - ६
किंमत - १,३२४ कोटी
राज्याचा वाटा - ५० टक्के
---
मुंबई-पुणे प्रवासाला गती
बदलापूर-कर्जत मार्गिकेची क्षमता वाढल्यामुळे मुंबई ते पुणे दिशेच्या गाड्यांची वाहतूक अधिक सुरळीत होईल. त्यामुळे गाड्यांच्या फेऱ्या वाढवणे शक्य असल्याने अधिकाधिक प्रवाशांना दिलासा मिळेल.
----
औद्योगिकपट्ट्याला थेट फायदा
या विभागात मोठ्या प्रमाणावर औद्योगिक वाढ होत आहे. नवीन मार्गिका तयार झाल्यास मालवाहतुकीची क्षमता वाढेल. दरवर्षी ७.२ दशलक्ष टन अतिरिक्त मालवाहतूक, ४१ लाख लिटर डिझेलची बचत आणि ४६.२ कोटी रुपयांची आर्थिक बचत अपेक्षित आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com